अतुल सुभाषचा मुलगा सापडला... पोलिसांपर्यंत पोहोचली माहिती, अखेर कोणाला मिळणार कस्टडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 19:25 IST2025-01-08T19:25:34+5:302025-01-08T19:25:52+5:30
Atul Subhash : बंगळुरूच्या अतुल सुभाषचा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेला मुलगा आता सापडला आहे.

अतुल सुभाषचा मुलगा सापडला... पोलिसांपर्यंत पोहोचली माहिती, अखेर कोणाला मिळणार कस्टडी?
बंगळुरूच्या अतुल सुभाषचा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेला मुलगा आता सापडला आहे. हरियाणाच्या फरिदाबादमदील एका निवासी शाळेने बंगळुरू पोलिसांना माहिती दिली. एक चार वर्षांचा मुलगा सध्या त्यांच्या शाळेच्या वसतीगृहात राहत आहे. या वृत्तामुळे अतुलचं कुटुंब आणि त्याची पत्नी यांच्यात सुरू असलेला कस्टडीचा वाद आणखी वाढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाला फरीदाबादच्या सत्ययुग दर्शन विद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. शाळा प्रशासनाने सांगितलं की, हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये त्याला विशेष व्यवस्थेसह वसतिगृहात ठेवण्यात आलं आहे, कारण त्याला सुट्टीसाठी कोणीही न्यायला आलं नाही. मुलाची आई निकिता सिंघानिया यांनी स्वत: शाळा प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली होती आणि प्रवेश घेतनाच्या कागदपत्रांमध्ये मुलाच्या वडिलांचा तपशील भरला नव्हता. शाळेचे प्राचार्य डॉ.अरुणकुमार शर्मा यांनी पोलीस ठाण्यात पत्राद्वारे ही माहिती दिली आहे.
वृत्तसंस्थेनुसार, मुलाच्या कस्टडीवरून कुटुंबांमध्ये तणाव वाढत आहे. अतुलच्या पालकांनी नातवाच्या सुरक्षिततेचा हवाला देत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. निकिताने मुलाचा एटीएमसारखा वापर केला आणि पैशांची मागणी करत राहिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुसरीकडे निकिताच्या कुटुंबीयांचा आरोप केला आहे की, अतुल सुभाषने हुंड्याची मागणी केली होती, ज्यामुळे तिच्या वडिलांचा मृत्यू झाला.
कर्नाटक उच्च न्यायालयाने निकिता सिंघानिया यांच्याविरोधात दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळली आहे. तसेच अतुल सुभाषच्या आईला नातवाची कस्टडी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. न्यायालयाने सांगितलं की, कुटुंबाला नातवाला भेटण्याची परवानगी दिली जाऊ शकते, परंतु कस्टडी घेण्यासाठी वेगळी प्रक्रिया अवलंबावी लागेल.