भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 10:11 IST2025-09-11T10:11:15+5:302025-09-11T10:11:54+5:30
आरोप, अनैतिक संबंध आणि हत्येचा अयशस्वी प्रयत्न यामुळे या घटनेला वेगळेच वळण मिळाले आहे.

भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
विजयपुरा - मागील मंगळवारी कर्नाटकच्या विजयपुरा येथे धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका पत्नीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला. मध्यरात्री गळा दाबून पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला परंतु आरडाओरडीमुळे आणि घर मालकाच्या सतर्कतेने पती बीरप्पा पुजारीचा जीव वाचला. सध्या पतीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी पत्नी सुनंदाला अटक करण्यात आली तर तिचा प्रियकर सिद्दप्पा फरार झाला होता.
आधी व्हिडिओ जारी केला मग सापडला मृतदेह
आता सुनंदाच्या प्रियकराने अज्ञात लोकेशनवरून एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात त्याने हत्येचा कट सुनंदाचा होता असं सांगत मी केवळ सुनंदामुळे फसलो असा आरोप केला. त्यानंतर बुधवारी सिद्दप्पाचा मृतदेह अंजुतागी गावच्या वेशीवर एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. या घटनेने खळबळ माजली. सिद्दप्पाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. प्राथमिक अंदाजानुसार सिद्दप्पाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. परंतु आरोप, अनैतिक संबंध आणि हत्येचा अयशस्वी प्रयत्न यामुळे या घटनेला वेगळेच वळण मिळाले आहे. त्यामुळे पोलीस घटनेची सखोल चौकशी करत आहेत. सिद्दप्पाने व्हिडिओ जारी केला होता. त्यात तो म्हणाला होता की, मी फक्त सुनंदामुळे यात सहभागी झालो. तिने तिच्या पतीच्या हत्येचा कट रचला. त्यात ३-४ जण सहभागी होते. परंतु तिने फक्त तूच ये असा दबाव टाकला. आता हे लोक मला बीरप्पाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात अडकवत आहेत. सुनंदा, तिचा भाऊ आणि एक स्थानिक गावकरी यात सहभागी आहे जे मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप त्याने केला होता.
"याला सोडू नकोस...संपवून टाक.."
१ सप्टेंबरच्या रात्री अक्कमहादेवी नगर येथील ही घटना आहे. बीरप्पा पुजारी नावाचा व्यक्ती घरी झोपलेला होता. अचानक त्याच्या छातीवर एक व्यक्ती बसला, त्याने त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. दुसरा व्यक्ती त्याच्या पायाजवळ बसून गुप्तांगावर सतत वार करत होता. बीरप्पा हातपाय हलवू लागला, त्याचा पाय कूलरला लागला आणि कूलर खाली पडल्याने मोठा आवाज झाला. तेव्हा सुनंदा पुजारी याला संपवून टाक, सोडू नकोस असं जोरात बोलत होती. हा आवाज ऐकल्यानंतर घरमालक आणि त्यांची पत्नी राजेश्वरी घराबाहेर आले. त्यावेळी बीरप्पाच्या मुलाने रडत रडत दरवाजा उघडला तेव्हा सुनंदा धावत बाहेर आली, तिने घरमालकाला घरात येण्यापासून रोखले. बीरप्पाने त्याचा गळा दाबणाऱ्या व्यक्तीला ओळखले, ज्याच्यावरून सुनंदा आणि त्याच्यात भांडणे व्हायची. आणखी एक व्यक्ती यावेळी घरात होता, त्याचा चेहरा झाकलेला होता. या प्रकारानंतर बीरप्पाला हॉस्पिटलला दाखल करण्यात आले, बाकीचे फरार झाले परंतु सुनंदाला पोलिसांनी अटक केली.