हनी ट्रॅपमधून शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना गंडा घालण्याचा प्रयत्न, राजस्थानमधून एकजण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 00:02 IST2021-11-24T00:01:30+5:302021-11-24T00:02:32+5:30
Crime News: शिवसेनेचे कुर्ल्यातील आमदार Mangesh Kudalkar यांना काही जणांनी फोनवरून संपर्क साधून Honey Trapमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

हनी ट्रॅपमधून शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना गंडा घालण्याचा प्रयत्न, राजस्थानमधून एकजण अटकेत
मुंबई - गेल्या काही काळापासून हनी ट्रॅपच्या माध्यमातून प्रतिष्ठित लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. दरम्यान, अशा हनी ट्रॅपच्या सापळ्यामध्ये शिवसेनेच्या एका आमदारालाही अडकवण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी प्रसंगावधान दाखवल्याने या प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे कुर्ल्यातील आमदार मंगेश कुडाळकर यांना काही जणांनी फोनवरून संपर्क साधून हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुडाळकर यांनी त्वरित पोलिसांच्या सायबर सेलकडे संपर्क साधला. त्यानंतर सायबर सेलने त्यांना आरोपीला ऑनलाईन पैसे पाठवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे आरोपीचा माग काढणे सोपे झाले. अखेरीस या प्रकरणात पोलिसांनी राजस्थानमधील सिकरी येथून मोसमुद्दिन नावाच्या एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या, दरम्यान, या प्रकरणात अजून काही आरोपींना पोलिसांकडून अटक होण्याची शक्यता आहे.
याबाबत आमदार मंगेश कुडाळकर यांनी सांगितले की, काही जणांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधला. ते मला व्हिडीओ कॉल करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच त्यांनी माझ्याकडे पैशांची मागणी केली. मला त्यांच्याबाबत संशय आल्यानंतर मी सायबर क्राईमशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांनी सायबर क्राईमच्या अधिकारी रश्मी करंदीकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रकरणात चांगले मार्गदर्शन केले, असे मंगेश कुडाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.