राय येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 22:01 IST2019-11-12T22:00:13+5:302019-11-12T22:01:25+5:30

आदल्या दिवशीच भरले होते 9 लाख रुपये; बँकेबाहेर मशिन टाकून पळाले चोरटे

ATTEMPT OF ATM MACHINE THEFT AT CENTRAL BANK IN GOA | राय येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

राय येथील सेंट्रल बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देहे एटीएम मशिन फोडून त्यातील पैसे काढण्यास यश न आल्याने चोरटय़ांनी ते बँकेबाहेरच टाकून पळ काढला.सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी आता आपल्या मुख्य शाखेशी संपर्क साधला असून मुख्य शाखेतून तंत्रज्ञ पाठवावेत अशी मागणी केली आहे.

मडगाव -  उत्तर गोव्यात एटीएम पळवून बँकांना लाखो रुपयांना लुटण्याचे प्रकार याआधी घडलेले असताना सोमवारी रात्री दक्षिण गोव्यातील राय भागातील सेंट्रल बँकेचेएटीएमही लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. हे एटीएम मशिन फोडून त्यातील पैसे काढण्यास यश न आल्याने चोरटय़ांनी ते बँकेबाहेरच टाकून पळ काढला.

मायणा - कुडतरी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो, सोमवारी रात्री व मंगळवारी सकाळी या दरम्यान हा चोरीचा प्रयत्न झाला. चोरटय़ांनी एटीएम कक्षात जाऊन मशिन बाहेर काढली. त्यानंतर ती बाहेर काढताना एकतर ती वरुन खाली पडली असावी किंवा मुद्दामहून पाडली असावी असे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र मशिन फोडल्याच्या कुठल्याही खुणा आढळल्या नाहीत. त्यामुळे हा केवळ चोरीचा प्रयत्न होता असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.

सेंट्रल बँकेच्या राय शाखेचे व्यवस्थापक रामानंद पै यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास या एटीएममध्ये 9 लाख रुपयांची भरली होती. सायंकाळी 6 वाजता शाखा बंद करुन कर्मचारी आपल्या घरी गेले. या एटीएमच्या सुरक्षेसाठी कुठल्याही सुरक्षा रक्षकाची नेमणूक केलेली नसून केवळ सीसीटीव्हीच्या पहाऱ्यावर या मशिनची देखरेख ठेवली जायची. मंगळवारी सकाळी कर्मचारी कामावर रुजू होण्यासाठी बँकेत आले असता त्यांना बँकेच्या बाहेर एटीएम मशिन पडलेले दिसून आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला.

मायणा - कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक गुरुदास कदम यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बँकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएम तंत्रज्ञाना बोलवून एटीएमची तपासणी करण्याचा प्रयत्न केला मात्र या मशिनचे डिजिटल लॉक मोडून टाकल्याने ते उघडू शकले नाही. त्यामुळे या मशिनातून रोख काढली गेली की नाही हे समजले नाही. मात्र प्रथमदर्शनी या मशिनची कुठलीही तोडफोड करण्यात आलेली नाही असे दिसून आले असे त्यांनी सांगितले. सेंट्रल बँकेच्या अधिकाऱ्यांनी आता आपल्या मुख्य शाखेशी संपर्क साधला असून मुख्य शाखेतून तंत्रज्ञ पाठवावेत अशी मागणी केली आहे. हे तंत्रज्ञ येण्यास आणखी दहा पंधरा दिवस जाण्याची शक्यता आहे त्यानंतरच या मशिनमधून रोख काढली गेली की नाही हे निसंदिग्धपणे स्पष्ट होणार आहे.

Web Title: ATTEMPT OF ATM MACHINE THEFT AT CENTRAL BANK IN GOA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.