हल्लेखोरांचे कपडे, नंबर प्लेट हस्तगत; पडघा येथून हस्तगत केलेले पुरावे फाॅरेन्सिककडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 03:18 AM2020-12-02T03:18:19+5:302020-12-02T03:18:37+5:30

शेख हत्याकांड : आरोपींचे हे कपडे मुंबईतील कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. राबोडीतील एका सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या हल्लेखोरांच्या कपड्यांशी सापडलेल्या कपड्यांची पडताळणी केली आहे.

The attacker's clothing, number plate seized; Evidence seized from Padgha to forensic | हल्लेखोरांचे कपडे, नंबर प्लेट हस्तगत; पडघा येथून हस्तगत केलेले पुरावे फाॅरेन्सिककडे

हल्लेखोरांचे कपडे, नंबर प्लेट हस्तगत; पडघा येथून हस्तगत केलेले पुरावे फाॅरेन्सिककडे

Next

जितेंद्र कालेकर

ठाणे : मनसेचे राबोडीतील पदाधिकारी जमील शेख यांच्यावर हल्ला करणाऱ्या कथित संशयित आरोपींचे कपडे आणि दुचाकीची फेकून दिलेली नंबरप्लेटही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने सोमवारी हस्तगत केली. दरम्यान, खंडणीविरोधी पथकातील काही अधिकाऱ्यांनाही या प्रकरणाच्या समांतर तपासाचे आदेश दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

जमील यांच्यावर गोळी झाडतेवेळी मोटारसायकल चालविणाऱ्या शाहीद शेख आणि प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराचे कपडे तसेच दुचाकीला वापरलेली बनावट क्रमांकाची प्लेटही भिवंडीतील पडघा येथील एका गटारातून गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सोमवारी जप्त केली. आरोपींचे हे कपडे मुंबईतील कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. राबोडीतील एका सीसीटीव्हीमध्ये दिसलेल्या हल्लेखोरांच्या कपड्यांशी सापडलेल्या कपड्यांची पडताळणी केली आहे. युनिट एकच्या पथकाने २५ नोव्हेंबर रोजी या हत्याकांडातील शाहीद याला राबोडीतून अटक केली. त्याच्याच चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे. प्रत्यक्ष गोळीबार करणारा तसेच त्यांना मदत करणाऱ्यांचा उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे कसून शोध घेतला जात आहे.

ठाण्यातून युनिट एकचे एक पथक याआधीच तिकडे रवाना झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी आता ठाणे खंडणीविरोधी पथकातील आणखी एक पथकही समांतर तपासासाठी रवाना केल्याची माहिती सूत्रांनी  दिली. उत्तर प्रदेशचे एसटीएफचे (स्पेशल टास्क फोर्स) अधिकारीही ठाणे पोलिसांना मदत करीत  आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेशातही ठाण्यातून आलेल्या या पथकांची जोरदार चर्चा सुरू असल्यामुळे आरोपींनी आपला ठिकाणा बदलल्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांना प्रत्येक पाऊल सावधगिरीने टाकावे लागत आहे. यातील हल्लेखोर आणि मुख्य सूत्रधाराचा अद्याप कोणताच शोध न लागल्यामुळे तपास पथकावरील दबाव वाढल्याची कबुली सूत्रांनी दिली.

Web Title: The attacker's clothing, number plate seized; Evidence seized from Padgha to forensic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.