ATS busted large net of MD drugs in Mumbai; The tip was given by informer of Daya Nayak | एमडीचे मोठे जाळे उद्धवस्त; दया नायक यांच्या खबऱ्याने दिली होती टीप
एमडीचे मोठे जाळे उद्धवस्त; दया नायक यांच्या खबऱ्याने दिली होती टीप

ठळक मुद्दे महेंद्र परशुराम पाटील (४९) याच्याकडे दोन किलो १०० ग्रॅम तर दुसरा आरोपी संतोष बाळासाहेब आडके (२९) अशी आणखी दोन किलो २०० ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले आहे.चौकशीत शहरातील एका बड्या ड्रग्स विक्रेत्याला देण्यासाठी हा साठा आणल्याचे आरोपींच्या चौकशीत निष्पन्न झाले.

मुंबई -  मुंबईतील एमडीचे मोठे जाळे उद्धवस्त करण्यात दहशतवाद विरोधी पथकाला(एटीएस) यश आले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १४ किलो ३०० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्याची किंमत ५ कोटी ६० लाख रुपये असल्याची माहिती एटीएसने दिली आहे. या दोन्ही आरोपींवर अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत (एनडीपीएस) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी अटक करण्यात आलेला पहिला आरोपीकडील स्कायबॅगमध्ये महेंद्र परशुराम पाटील (४९) याच्याकडे दोन किलो १०० ग्रॅम तर दुसरा आरोपी संतोष बाळासाहेब आडके (२९) अशी आणखी दोन किलो २०० ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले आहे.

नववर्षाच्या पूर्व संध्याला काही दिवसच उरले असल्यामुळे एटीएसची शहरातील ड्रग्स माफियांवर पाळत होती. त्यावेळी ड्रग्सचा मोठा व्यवहार ६ डिसेंबर दुपारी तीनच्या सुमारास होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक यांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार एटीएसच्या दोन पथकांनी विलेपार्ले पूर्व येथील मधुबन बार व रेस्टॉरन्टजवळ सापळा रचला. त्यावेळी खबऱ्यांनी दिलेल्या माहितीशी मिळतेजुळते असलेले दोन संशयित तेथे घुटमळताना पोलिसांना आढळले. त्यावेळी त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे एमडी ड्रग्स सापडले. चौकशीत शहरातील एका बड्या ड्रग्स विक्रेत्याला देण्यासाठी हा साठा आणल्याचे आरोपींच्या चौकशीत निष्पन्न झाले.

दोन्ही आरोपी सांगलीतील कासेगाव येथील रहिवासी आहेत. पुण्यातल्या सासवड तालुक्‍यातील गोदामात ठेवलेल्या त्याच औषधाची आणखी एक माल असल्याचे आडके यांनी अधिक चौकशीसाठी कबूल केले. त्यानंतर एटीएसने तेथे छापा टाकून आणखी १० किलो एमडीचा साठा जप्त केला. आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना शिवडी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १२ डिसेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सची किंमत ५ कोटी ६० लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. उपायुक्त विक्रम देशमाने, उपायुक्त विनयकुमार राठोड व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: ATS busted large net of MD drugs in Mumbai; The tip was given by informer of Daya Nayak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.