मुंबई - अंधेरीमध्ये एटीएम सेंटर फोडणाऱ्या एका तरुणाला साकीनाका पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. राजू बंगेरा (वय २३) असे या तरुणाचे नाव असून एका सतर्क फुलवाल्यामुळे हा प्रकार पोलिसांपर्यंत कळला आणि उघडकीस आला. साकीनाकामधील जंगलेश्वर महादेव मंदिर मार्गावरील एका एटीएम सेंटरमध्ये रविवारी पहाटे राजू पैसे काढण्यासाठी आत एटीएम सेंटरमध्ये गेला. खूप वेळ झाला तरी तो बाहेर येत नव्हता. दरम्यान येथून जाणाऱ्या फुलवाल्याची नजर राजूवर पडली. राजूच्या संशयास्पद हालचाली पाहून फुलवाल्याने याबाबतची माहिती साकीनाका पोलिसांना दिली. साकीनाका पोलिसांचे पथक तात्काळ या एटीएम सेंटरजवळ पोहोचले. पोलिस बाहेर सापळा लावून बसले आहेत याची किंचितही मागमूस राजूला लागला नाही. राजू नशेमध्ये एटीएम मशीन फोडण्यात व्यग्र होता. बराच उशीर तो बाहेर येत नसल्याने अखेर पोलिस आत शिरले आणि त्याला ताब्यात घेतले. राजू अंधेरीच्या संघर्ष नगरमध्ये राहत असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा तपास सुरू असल्याचे साकीनाका पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संबंधित बँकेकडून एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले असल्याची माहिती पोलीसांनी दिली.
सतर्क फुलवाल्यामुळे एटीएम सेंटर फोडणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 14:00 IST