निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, आयुर्वेदिक रुग्णालयातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 18:24 IST2020-11-29T18:24:13+5:302020-11-29T18:24:48+5:30
Crime News : डॉ. मनोज सांगळे हे अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, आयुर्वेदिक रुग्णालयातील घटना
गुरुकुंज मोझरी/ तिवसा (अमरावती) : येथील श्रीगुरुदेव आयुर्वेदिक रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी मनोज सांगळे (४९) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अमरावती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगाळे यांच्या राहत्या घरी शनिवारी रात्री १२.१० ते १२.२० च्या सुमारास ही घटना घडली. तिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
डॉ. मनोज सांगळे हे अनेक वर्षांपासून निवासी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत आहेत. शनिवारी रुग्णालयीन कामकाज आटोपून ते आवारातील निवासस्थानी आराम करायला गेले. अशातच रात्रीच्या सुमारास दवाखान्याचा मागील बाजूने असलेल्या गेटमधून काही अज्ञात हल्लेखोर त्यांच्या घरात शिरले. सांगळे यांनी त्या हल्लेखोरांचा प्रतिकारही केला. मात्र, त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविण्यात आला.
रक्ताच्या थारोळ्यात पडले असताना, त्यांनी रुग्णालयात रात्रपाळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी करून मदत मागितली. लागलीच सांगळे यांना उपचारासाठी अमरावतीला रवाना करण्यात आले. सध्या अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. तिवसा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून सुगावा?
सततच्या चार घरफोडीनंतर निवासी वैदयकीय अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला होणे ही गुरुकुंजवासीयांसाठी चिंताजनक बाब ठरली आहे. घटनास्थळानजीक एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये ११.१० ते १२.२० दरम्यान अज्ञात इसमांच्या संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या आहेत. त्याअनुषंगाने तिवसा पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.