अश्विनी बिद्रेंच्या मृत्यूच्या दाखल्याची अद्याप प्रतीक्षा; सर्वच प्राधिकरणांनी दिली उडवाउडवीची उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:22 IST2025-06-07T12:21:44+5:302025-06-07T12:22:02+5:30

अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून दीड महिना उलटला

Ashwini Bidre's death certificate still awaited; All authorities gave mixed answers | अश्विनी बिद्रेंच्या मृत्यूच्या दाखल्याची अद्याप प्रतीक्षा; सर्वच प्राधिकरणांनी दिली उडवाउडवीची उत्तरे

अश्विनी बिद्रेंच्या मृत्यूच्या दाखल्याची अद्याप प्रतीक्षा; सर्वच प्राधिकरणांनी दिली उडवाउडवीची उत्तरे

लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल  सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा निकाल लागून दीड महिना उलटला तरी त्यांची कन्या सूची हिला आपल्या आईच्या मृत्यूचा दाखला मिळालेला नाही. मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबीयांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याचे तहसीलदार, पनवेल आणि मीरा-भाईंदर पालिकांच्या आयुक्तांसह नवी मुंबई पोलिसांकडे अर्ज केले होते. मात्र, सर्वच प्राधिकरणांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला देण्यास टाळाटाळ केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, असे अश्विनी यांचे पती राजू गोरे म्हणाले.

बिद्रे यांची नऊ वर्षांपूर्वी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने आपल्या मीरा रोडमधील घरात हत्या केली होती. या प्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने कुरुंदकरला २१ एप्रिल २०२५ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

न्यायालयात दाद मागणार

अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला माझ्या मुलीसाठी आवश्यक आहे. तरीही आम्हाला मृत्यूचा दाखला दिला जात नाही. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असून, पनवेल, मीरा-भाईंदरचे पालिका आयुक्त आणि नवी मुंबईचे पोलिस आयुक्त यांना प्रतिवादी बनवणार आहे, अशी प्रतिक्रिया राजू गोरे यांनी दिली.

प्राधिकरणांना सूचना

अश्विनी यांच्या मृत्यूचा दाखला उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याच्या सूचना न्यायालयाने संबंधित प्राधिकरणाला दिल्या होत्या. अश्विनी यांची मुलगी सूची आणि पती राजू यांनी हातकणंगले तहसीलदार, पनवेल आयुक्त, मीरा-भाईंदर आयुक्त, नवी मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे अर्ज केला होता. 

Web Title: Ashwini Bidre's death certificate still awaited; All authorities gave mixed answers