Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
By वैभव गायकर | Updated: April 21, 2025 12:08 IST2025-04-21T12:07:03+5:302025-04-21T12:08:01+5:30
Ashwini Bidre Murder Case Verdict: कुंदन भंडारी आणि फळणीकर या दोन आरोपींना सात वर्षाची शिक्षा

Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल आला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कुरुंदकर हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी होता. त्याने त्याच्या अनुभवाचा फायदा घेत हे प्रकरण कमकुवत करण्याचा प्रयत्न केला होता. कुरुंदकर बरोबर सह आरोपी कुंदन भंडारी आणि फळणीकर या दोन आरोपींना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नवी मुंबई पोलीसांनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांच्या तक्रारींवर काहीच दखल घेतली नव्हती. म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात 4 ऑक्टोबर 2016 रोजी याचिका दाखल केली होती. यानंतर 31 जानेवारी 2017 ला खून करण्याच्या उद्देशून अपहरण करणे आदी बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर वर कंळबोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर फेब्रुवारी 2017 पासून ऑक्टोबर 2017 पर्यंत नोकरीवरून कुरुंदकर गायब झाला होता.
16 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती , आणि मुख्य न्यायमूर्ती भारत सरकार यांना निवेदन करून राजू गोरे आणि 9 वर्षाची मुलगी सिध्दी यांनी न्याय मिळत नसल्यामुळेच ईच्छा मरणाची परवानगी मागितली होती. याची दखल राष्ट्रपतींनी घेत 25 जानेवारी 2018 ला चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. बिद्रे यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी झाली. मात्र कुरुंदकर यांचे पोलीस दलातील चांगले प्रस्थ लक्षात घेता त्यांच्यावर कारवाई झाली नाही.
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार अभय शामसुंदर कुरूंदकर (रा. भार्इंदर पूर्व, जि. ठाणे), एकनाथ खडसे यांचा भाचा ज्ञानदेव दत्तात्रय पाटील ऊर्फ राजू पाटील (रा. तळवेल, ता. भुसावळ, जि. जळगाव), कुरूंदकरचा कारचालक कुंदन भंडारी, कुरूंदकरचा बालपणीचा मित्र महेश फळणीकर (रा. आजरा) या चौघांना अटक केली होती. फळणीकर याने हत्येची कबुली दिल्याने तपासाची गती वाढली होती.
अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या निकालाकडे राज्यासह पोलिस दलाचे लक्ष लागले होते. पनवेल येथील सत्र न्यायाधीश कृ. प. पालदेवार यांनी खटल्याचा निकाल दिला. पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रेचे अपहरण, हत्या, शरीराचे वूडकटरने तुकडे करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकरला दोषी ठरविले होते; तर साथीदार कुंदन भंडारी, महेश फाळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. या घटनेतील तपासात अक्षम्य दुर्लक्ष केल्याने कोर्टाने नवी मुंबई पोलीस दलातील तपास अधिकारी कोंडीराम पोपेरे, सुरवसे , तुषार जोशी, प्रकाश निलेवाड, सीपी हेमंत नगराळे यांच्यावर ठपका ठेवला.