प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:37 IST2025-04-22T06:37:09+5:302025-04-22T06:37:34+5:30
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणात व्हिडीओ महत्त्वाचा दुवा

प्रेमसंबंध, हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; तांत्रिक पुराव्यामुळे फुटले अभय कुरुंदकरचे बिंग
पनवेल - प्रेमसंबंधातून वाद वाढल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याने सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांचा खून करून मृतदेहाचे तुकडे वसईच्या खाडीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण, या दोघांतील वादाचे व्हिडीओ नातेवाइकांच्या हाती लागले आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दडपलेल्या गुन्ह्याला दोन वर्षांनी वाचा फोडली.
अश्विनी गोरे-बिद्रे या २००६ मध्ये पोलिस दलात उपनिरीक्षकपदावर रुजू झाल्या. पुणे येथे पहिले पोस्टिंग मिळाले. त्यानंतर त्यांची सांगलीला बदली झाली. त्याच ठिकाणी त्यांची तत्कालीन पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्याशी ओळख झाली. पुढे दोघांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली झाली तरी प्रेमसंबंध सुरूच होते. हळूहळू दोघांमध्ये वादाचे खटके उडू लागले. तो अश्विनीला जिवे मारण्याची धमकी देत होता. तुझ्या नवऱ्याला गायब करेन, अशी भीती घालत होता. अखेर वाद विकोपाला गेला.
अश्विनी भेटल्या आणि...
एप्रिल २०१६ मध्ये अश्विनी कळंबोली पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या. ११ एप्रिलला त्या कुरुंदकरला भेटायला ठाण्याला गेल्या. तिथे कुरुंदकर एकटाच राहत होता. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर कुरुंदकरने अश्विनीच्या डोक्यात बॅट घालून तिचा खून केला. करवतीने मृतदेहाचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले. दुसऱ्या दिवशी रात्री मृतदेहाचे तुकडे मित्रांच्या सहाय्याने वसईच्या खाडीत फेकून दिले.
तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त संगीता अल्फान्सो आणि विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी कोल्हापुरी फेटे बांधून सत्कार केला.
वादाचे व्हिडीओ समोर
पोलिसी शिताफीने खून पचवल्याच्या अविर्भावात कुरुंदकर वावरत होता; पण, कळंबोलीतील तिच्या फ्लॅटमध्ये लॅपटॉप, मोबाइल मिळाला. त्यातून दोघांमधील वादाचे व्हिडीओ मिळाले. हेच पुरावे घेऊन गोरे-बिद्रे कुटुंबीय नवी मुंबई पोलिसांकडे गेले; पण त्यांनी दाद दिली नाही. अखेर अखेर उच्च न्यायालयाचा आदेशानंतर नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदविला.