मेसेजवर क्लिक करताच दीड लाखांची रक्कम उडाली; अशी झाली फसवणूक
By विलास गावंडे | Updated: August 14, 2022 23:38 IST2022-08-14T23:38:01+5:302022-08-14T23:38:42+5:30
पुसद ग्रामीण ठाण्यात कलम ४२० भादंविसह कलम ६७ आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेसेजवर क्लिक करताच दीड लाखांची रक्कम उडाली; अशी झाली फसवणूक
यवतमाळ - ऑनलाईन फसवणुकीच्या घटना थांबता थांबेना पुसद तालुक्यातील राजना येथे मोबाईलवर आलेल्या मेसेजला क्लीक करताच एक लाख ५४ हजार ९९८ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस ठाण्यात आयटी ॲक्टनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, राजना येथील राजेंद्र नामदेव राठोड हे घरी बसलेले असताना त्यांना मोबाईलवर तुमचे अकाऊंट सस्पेन्ड केले असून तुम्ही पॅन कार्ड अपडेट करा त्यासाठी पाठविलेल्या लिंक वर क्लीक करण्यास सांगण्यात आले. राजेंद्र राठोड यांनी या मेसेजवर क्लीक केले असता त्यांच्या अकाऊंटमधून ९९ हजार ९९८ रुपये उडाले. या प्रकारामुळे ते गोंधळून गेले असतानाच थोड्या वेळाने आणखी २४ हजार ९९५ आणि त्यानंतर ३० हजार असे एकूण १ लाख ५४ हजार ९९४ रुपयांची रक्कम खात्यातून उडाली. रक्कम उडाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर, राठोड यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण ठाण्यात कलम ४२० भादंविसह कलम ६७ आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.