Arrested within one hours for looting Rs 7.5 lakh from a trader | गोळीबारकरुन व्यापाऱ्याचे सव्वासात लाख रुपये लुटणारे तिघे तासाभरात जेरबंद

गोळीबारकरुन व्यापाऱ्याचे सव्वासात लाख रुपये लुटणारे तिघे तासाभरात जेरबंद

ठळक मुद्देनरसी-बिलोली रस्त्यावरील थरार

नरसी (जि. नांदेड): चाकूृचा धाक दाखवून, हवेत गोळीबार करुन व्यापाऱ्याकडील सव्वासात लाख रुपये असलेली बॅग पळविण्याची घटना १ जून रोजी रात्री नरसीपासून १ कि.मी. अंतावरील बिलोली रोडवर घडली, मात्र व्यापारी, नागरिक व पोलिसांच्या मदतीने तासाभरताच तीन चोरट्यांना अटक करण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर व अन्य वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

कासराळी येथील व्यापारी संजय व्यंकटेश उपलंचवार यांचे मुखेड येथील एका व्यापाऱ्याकडे ७ लाख २४ हजार रुपये येणे होते. त्यामुळे उपलंचवार यांचा मुनीम आनंदा हे १ जून रोजी सोमवारी सायंकाळच्या दरम्यान मुखेड येथे गेले होते. रक्कम घेवून एका ओळखीच्या वाहणात बसून रात्री नरसी येथे आनंदा पोहोचले व मात्र नरसीहून कासराळीला जाण्यासाठी वाहन नसल्याने त्यांनी मालक उपलंचवार यांना फोन करुन नरसीला आल्याची माहिती दिली.  मालक येईपर्यंत आनंदा बसस्थानकात गेले होते.  तेवढ्यात नांदेडहून मोटारसाकलवर आलेल्या तिघांची नजर आनंदावर पडली. बँग व त्याच्या संशयास्पद हालचाली पाहता या तिघांनी त्यांच्यावर हल्ला करण्याच्या अगोदरच मालक उपलंचवार हे आनंदाला घेण्यासाठी मोटरसायकलवर नरसीला आले.

मालक व मुनीम दोघे कासराळीकडे जात असतांना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी पाठलाग सुरु करुन  लोहगावच्या वळणावर मोटारसायकल अडवून मुनीमाच्या हातातील पैशाची बँग हिसकावण्याचा प्रयत्न केला. मुनीम बॅग सोडत नसल्याने त्यांना चाकूचा धाक दाखवण्यात आला. त्यामुळे मुनीम बॅग सोडून जिवाच्या आकांताने बाजूच्या शेतात पळाले. मालक उपलंचवार यांनी मात्र चोरट्यांचा निकराने सामना करत तिघापैकी एका  चोरट्याला पकडून ठेवण्यात यश मिळविले. त्यामुळे दुसऱ्या चोरट्याने त्यांच्या दिशेने गोळी झाडली़ ही गोळी उपलंचवार यांच्या डोक्याला घासून गेली़ पैशाची बॅग हस्तगत केल्यानंतर तिनही चोरट्यांनी त्यांची मोटारसायकल जागेवरच सोडून लोहगाव शिवारातील शेतात धुम ठोकली.

उपलंचवार यांनी घटनास्थळावरुन लोहगाव गाठले व तेथील काहींना घडलेली घटना सांगितली. त्यामुळे लोहगावच्या नागरिकांनी रामतीर्थ पोलिसांना संपर्क साधून घटना सांगितली़ चोरटे  कोणत्या दिशेने गेले याचीही माहिती दिली. घटनेची माहिती समजताच सपोनि़ सोमनाथ शिंदे फौजफाट्यासह चोरट्यांच्या शोधात निघाले. नागरिक आणि पोलीसांच्या शोधमोहीमेत रात्री उशीरा नरसी शिवारात तीनही चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. आरोपींमध्ये मिर्झा सब्बर बेग गफार बेग (३२ वर्ष रा.देगलूर नाका,नांदेड) सुनील सुरेश सुळगेकर (२० वर्ष बंदाघाट) शेख मोईज शेख महेमूद (२२ रा.देगलूर नाका नांदेड) अशी आरोपींची नावे असून, त्यांना अटक करण्यात आली. या तिघांना पकडण्यासाठी सपोनि सोमनाथ शिंदे, गणपत राठोड, शिवाजी श्रीसागर, विलास भोळे व अन्य सहका-यांनी सापळा रचला. सर्व आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अशी माहिती पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिली़ 

Web Title: Arrested within one hours for looting Rs 7.5 lakh from a trader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.