गुन्ह्यात अटक न करण्यासाठी २ लाखांची मागणी करणाऱ्याला अटक
By धीरज परब | Updated: January 10, 2023 22:18 IST2023-01-10T22:16:53+5:302023-01-10T22:18:55+5:30
उपअधीक्षक अश्विनी पाटीलसह भावसार, शिंदे, पाटील यांच्या पथकाने तपास करून आरोपी हबीब ह्याला ताब्यात घेतले...

गुन्ह्यात अटक न करण्यासाठी २ लाखांची मागणी करणाऱ्याला अटक
मीरारोड - मीरारोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी २ लाख रुपयांची मागणी करणाऱ्यास ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
यातील तक्रारदार ३४ वर्षीय इसमाविरुद्ध मिरारोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी व इतर लोकसेवक हे २ लाख रुपयांची लाच मागत आहेत, असे हबीब इब्राहीम रेहमान (३९) रा. काशिमीरा याने तक्रारदारास सांगितले होते. तक्रादाराने या बाबत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
उपअधीक्षक अश्विनी पाटीलसह भावसार, शिंदे, पाटील यांच्या पथकाने तपास करून आरोपी हबीब ह्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ह्यातील लाच मागणारे मीरारोड पोलिस ठाण्यातील ते अधिकारी - कर्मचारी कोण ? याची चर्चा सुरू आहे.