दरोडयाच्या गुन्हयातील पॅरोलवर असलेल्या फरार कैद्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:25 IST2021-06-10T20:24:27+5:302021-06-10T20:25:39+5:30
Crime News : कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

दरोडयाच्या गुन्हयातील पॅरोलवर असलेल्या फरार कैद्याला अटक
डोंबिवली: दरोडयाच्या गुन्हयात सूरत येथील लाजपोर कारागृहात सात वर्षाची शिक्षा भोगणारा आणि पॅरोलवर सुटल्यावर पसार झालेल्या महेश उर्फ भु-या रमेशभाई चंदनशिवे याला रामनगर पोलीसांनी सापळा लावून बुधवारी अटक केली.
डोंबिवली पुर्वेकडील आयरेगांव ज्योतीनगरमध्ये राहणा-या महेश विरोधात गुजरात वलसाड जिल्हयातील डोंगरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दरोडयाच्या गुन्हयात त्याला सात वर्षाची कैद अशी शिक्षा तेथील सत्र न्यायालयाने 25 ऑगस्ट 2020 मध्ये सुनावली आहे. दरम्यान शिक्षा भोगत असलेल्या महेशला गुजरात येथील गांधीनगरमधील उच्च न्यायालयाने 12 एप्रिल 2021 पासून 14 दिवसांचा पॅरोल मंजूर केला होता. परंतू पॅरोलची मुदत संपली तरी तो कारागृहात हजर झाला नाही. तो पसार झाला होता. याची माहीती लाजपोर कारागृहातील अधिकारी कुंदनसिंग धारगे यांनी डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर महेशला अटक करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते. पोलीस निरिक्षक समशेर तडवी यांच्या पथकाला फरार कैदी महेशला अटक करण्यात यश आले आहे. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.