'एक चादर मागितली म्हणून...'; घरी परतणाऱ्या जवानाची रेल्वे अटेंडंटने केली हत्या, कोचपर्यंत शोधत पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 13:30 IST2025-11-04T13:12:54+5:302025-11-04T13:30:23+5:30
कर्तव्यावरुन घरी परतणाऱ्या जवानाची ट्रेनमध्ये एका चादरीवरुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली.

'एक चादर मागितली म्हणून...'; घरी परतणाऱ्या जवानाची रेल्वे अटेंडंटने केली हत्या, कोचपर्यंत शोधत पळाला
Sabarmati Express Crime: बिकानेर-जम्मूतवी साबरमती एक्सप्रेस ट्रेनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. फक्त एका चादरीच्या मागणीवरून झालेल्या क्षुल्लक वादातून रेल्वे अटेंडंटने कर्तव्यावर असलेल्या एका सेना जवानाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे रेल्वे प्रवासातील कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलिसांनी आरोपी रेल्वे अटेंडंटला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे. जवानाच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाल्यानंतर उद्या त्यांच्या मूळ गावी शहीद जवान म्हणून अंत्यसंस्कार केले जातील.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक जवान जिग्नेश चौधरी हे मूळचे गुजरातमधील साबरमतीचे रहिवासी होते आणि त्यांची जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथे पोस्टिंग होती. ते फिरोजपूर कॅन्टोन्मेंटहून साबरमती एक्सप्रेसने आपल्या घरी परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. रविवार रात्रीच्या सुमारास एसी कोच-३ मध्ये जवान जिग्नेश चौधरी यांनी अटेंडंट जुबेर मेमन याच्याकडे चादर मागितली. चादर मागितल्यावरुन दोघांमध्ये तीव्र वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या अटेंडंट जुबेर मेमनने जिग्नेश यांना शोधत त्यांच्या कोचपर्यंत धाव घेतली. तिथे पोहोचल्यावर त्याने कोणताही विचार न करता हिंसक पवित्रा घेतला आणि चाकूने जवान जिग्नेश यांच्या पायच्या पोटरीवर वार केला. चाकू लागल्यामुळे जिग्नेश यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच राजस्थानच्या बीकानेर रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि हत्येच्या या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अटेंडंट जुबेर मेमन याला तात्काळ अटक केली. सुरुवातीला काही कंत्राटी रेल्वे अटेंडंटनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. घटनेच्या तपासणीसाठी, ज्या एसी कोचमध्ये जवानावर हल्ला झाला, तो डबा सील करण्यात आला असून, प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हलवण्यात आले आहे. तसेच, ट्रेन जोधपूरला पोहोचताच फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सखोल तपास सुरू केला आहे. एका क्षुल्लक वादातून देशाच्या जवानाचा जीव जाण्याची ही घटना अत्यंत धक्कादायक असून, रेल्वे प्रशासन या प्रकरणी काय कठोर भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात एका सैनिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हा जवान एका खून प्रकरणात साक्ष देण्यासाठी रजेवर होता. १० एप्रिल रोजी या सैनिकाच्या डोक्यात आणि छातीत गोळी झाडण्यात आल्या. ते जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात होते आणि एका खून प्रकरणात साक्ष देण्यासाठी चार दिवसांच्या रजेवर घरी आला होता.