नागपुरात नव वर्षाच्या पार्टीत धक्का लागल्यामुळे सशस्त्र हल्ला, दोघे गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 21:25 IST2020-01-01T21:23:51+5:302020-01-01T21:25:12+5:30
नवे वर्ष साजरे करण्यासाठी आयोजित पार्टीत धक्का लागल्यामुळे युवकांच्या समूहाने आपल्याच साथीदारांवर शस्त्राने हल्ला करून त्यांना मारहाण केली. मंगळवारी रात्री वाठोडाच्या श्रावणनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला.

नागपुरात नव वर्षाच्या पार्टीत धक्का लागल्यामुळे सशस्त्र हल्ला, दोघे गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवे वर्ष साजरे करण्यासाठी आयोजित पार्टीत धक्का लागल्यामुळे युवकांच्या समूहाने आपल्याच साथीदारांवर शस्त्राने हल्ला करून त्यांना मारहाण केली. मंगळवारी रात्री वाठोडाच्या श्रावणनगरात घडलेल्या या घटनेमुळे तणाव निर्माण झाला.
वाठोडा पोलिसांना सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपीत संदीप ऊर्फ तुषार पारडकर, विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता, मनीष लाखोडकर, आकाश रेवतकर, प्रकाश कोसरे, विक्की पाटील यांचा समावेश आहे. त्यांचा बादल नावाचा साथीदार फरार आहे. जखमीत सौरभ शेखर उरकुडे (१९), जावेद अली (३२) यांचा समावेश आहे. सौरभ, जावेद आणि आरोपी श्रावणनगरात राहतात. मंगळवारी रात्री नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी आरोपी आणि वस्तीतील नागरिकांनी घासीदास मंदिराजवळ पार्टीचे आयोजन केले होते. तेथे गाणे लावून नाचत सर्वजन नव्या वर्षाचे स्वागत करीत होते. जावेद आणि सौरभही तेथे आले होते. दोघेजण आरोपी आणि इतर नागरिकांसोबत नाचत होते. आरोपी आणि त्यांचे साथीदार नशेत होते. त्यामुळे नाचताना नागरिकांना त्यांचा धक्का लागत होता. यावरून आरोपींशी जावेद आणि सौरभला वाद झाला. आरोपींनी त्यांना शिविगाळ केली. दोघांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सौरभ आणि जावेदने शांत राहण्यास सांगितल्यामुळे आरोपी आणखीनच चिडले. त्यांना शस्त्र, दगड आणि काठीने सौरभ व जावेदवर हल्ला केला. दोघांनाही गंभीर जखमी केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पार्टीत खळबळ उडाली. त्यानंतर आरोपी तेथून पळून गेले. वस्तीतील नागरिकांनी सौरभ आणि जावेदला रुग्णालयात पोहोचविले. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी खुनाचा प्रयत्न आणि दंगा घडविण्याचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. सौरभ आणि जावेदवर उपचार सुरु आहेत.