मुलाशी वाद, शेअर ट्रेडर बापाचा तांडव; तीस गोळ्या झाडल्या; तीन पोलीस जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 20:05 IST2022-06-19T19:59:09+5:302022-06-19T20:05:27+5:30
Kanpur Share Market Trader Crime News: राजकुमार दुबे हे कानपूरमध्ये शेअर बाजाराचा व्यवसाय करतात. त्याचा आज मुलगा सिद्धार्थसोबत वाद झाला.

मुलाशी वाद, शेअर ट्रेडर बापाचा तांडव; तीस गोळ्या झाडल्या; तीन पोलीस जखमी
कानपुरच्या श्याम नगरमध्ये रविवारी अनेक तास दहशतीचे वातावरण होते. एका शेअर ट्रेडरने स्वत:च्याच मुलासोबतच्या वादातून एवढ्या गोळ्या झाडल्या की मुसेवाला हत्याकांडाची आठवण झाली. यामुळे अनेक तास पोलिस आणि भागातील लोकांमध्ये मोठी धावपळ उडाली होती.
शेअर व्यापाऱ्याने दोन तासांत ३० गोळ्या फायर केल्या. धक्कादायक बाब म्हणजे त्याने पोलिसांवरही थेट गोळ्या झाडल्या. यामुळे पोलिसांच्या गाड्यांचे नुकसान झाले. तर ३ पोलीस जखमी झाले. दोन तासांच्या जिवघेण्या प्रयत्नांनंतर पोलिसांनी कसेतरी त्याच्या घरात घुसून त्याला ताब्यात घेतले. पोलिसांवर गोळीबार होऊ लागताच तातडीने सर्व पोलिसांना बुलेटप्रूफ जॅकेट देण्यात आले होते.
राजकुमार दुबे हे कानपूरमध्ये शेअर बाजाराचा व्यवसाय करतात. त्याचा आज मुलगा सिद्धार्थसोबत वाद झाला. राजकुमार यांनी लगेचच बंदुक घेऊन गल्लीमध्ये फायरिंग सुरु केली. पोलिसांना खबर मिळताच ते तिथे दाखल झाले. हे पाहून त्याने पोलिसांच्या गाडीवर देखील गोळ्या झाडल्या. फायरिंग झाल्यावर पोलिसांनी तातडीने बुलेटप्रूफ जॅकेट मागविली. तरीही तो पोलिसांवर फायर करत होता.
यामुळे पोलिसांच्या गाडीच्या काचा फुटल्या. तीन पोलीस जखमी झाले. डीसीपी प्रमोद कुमार यांच्यानुसार राजकुमार यांनी त्यांच्या मुलाशी वाद झाल्यानंतर गोळ्या फायर केल्याचे म्हटले आहे. २ तासात त्याने तीस गोळ्या झाडल्या. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याचे मेडिकल केले जाईल. एकाचवेळी एवढ्या फायर केल्याने आरोपीचा काय मनसुबा होता, याचा तपास पोलीस करत आहेत.