Archana Tiwari Missing Case:मध्य प्रदेशात ट्रेनमधून बेपत्ता झालेली अर्चना तिवारी १२ दिवसांनी सापडली आहे. इंदूर उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करणारी आणि दिवाणी न्यायाधीशाची तयारी करणारी अर्चना रक्षाबंधनाच्या दिवशी बेपत्ता झाली होती. भोपाळच्या राणी कमलापती पोलिस ठाण्याच्या रेल्वे पोलिसांनी अर्चनाला उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील नेपाळ सीमेजवळून शोधून काढले आहे. आता पोलिसांचे पथक अर्चनाला भोपाळला घेऊन येत आहे. पोलीस तिच्याकडे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
मध्य प्रदेशातील अर्चना तिवारी बारावीपासून बेपत्ता होती. अर्चना इंदूरमध्ये दिवाणी न्यायाधीश होण्याची तयारी करत होती. ७ ऑगस्ट २०२५ रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने कटनी येथील तिच्या घरी जाण्यासाठी इंदूर-बिलासपूर नर्मदा एक्सप्रेसमध्ये चढली. पण वाटेतच ती अचानक गायब झाली. बराच तपास केल्यानंतर, ती आता नेपाळ सीमेवरून पोलिसांना सापडली आहे. त्याआधी तिने कुटुंबासोबत फोनवर संवाद साधत आपण सुरक्षित असल्याचे आईला सांगितले होते. तसेच जीआरपीने ग्वाल्हेरच्या याप्रकरणी कॉन्स्टेबल राम तोमरला ताब्यात घेतले होते. राम तोमरने अर्चना तिवारीसाठी बसचे तिकीट बुक केल्याचे उघड झाले आहे.
७ ऑगस्टच्या रात्री अर्चना भोपाळ रेल्वे स्टेशनजवळ दिसली होती. त्यानंतर ती अचानक गायब झाली. ट्रेन कटनीला पोहोचली तेव्हा तिच्या सीटवर तिची बॅग आणि काही वस्तू आढळल्या, पण अर्चना गायब होती. त्यामुळे कुटुंबाने तात्काळ रेल्वे पोलिसांकडे यासंदर्भातील तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला. मात्र १२ दिवस अर्चनाचा काहीच पत्ता लागला नाही. त्यानंतर १३ व्या दिवशी अर्चना तिवारी नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी शहरात आढळून आली.
मिळालेल्या माहितीनुसार अर्चना काठमांडूला फिरण्यासाठी गेली होती. तिच्यासोबत इंदूरचा एक मुलगाही होता. अर्चनाने तिच्या आईला फोन करून ती सुरक्षित असल्याचे कळवले. पोलिसांनी कॉल लोकेशन शोधून तिचा शोध सुरू केला. त्यानंतर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील नेपाळ सीमेजवळून पोलिसांनी अर्चनाला ताब्यात घेतले.