नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:54 IST2025-08-21T16:52:50+5:302025-08-21T16:54:32+5:30
१३ दिवस बेपत्ता असलेल्या अर्चना तिवारीला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होताना दिसतो. ती कुणाला नजरही मिळवत नव्हती

नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
भोपाळ - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर येथे सापडलेली अर्चना तिवारी हिला पोलिसांनी कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. अर्चना तिवारीवर कुठलाही फौजदारी गुन्हा नोंद केला नाही. अर्चनाचे काका तिला घेऊन जाण्यासाठी आले होते. त्यावेळी काकाचा हातात हात पकडून अर्चना त्यांच्या बाजूला उभी होती. तिच्याबाबत उपस्थित झालेल्या सर्व प्रश्नावर तिने मौन बाळगले होते. १३ दिवसांनी अर्चना तिवारी सापडली होती. घरात लग्नाचा तगादा लावल्याने त्यापासून सुटका व्हावी म्हणून अर्चनाने बेपत्ता होण्याचा प्लॅन रचला होता.
अर्चना तिवारी १३ दिवसांनी लखीमपूर इथल्या नेपाळ बॉर्डरवर सापडली. लग्नापासून वाचण्यासाठी मित्राच्या मदतीने ती काठमांडूला पळाली होती. मला लग्न करायचं नाही म्हणून घरातून पळाल्याचं तिने पोलिसांना सांगितले. बुधवारी पोलिसांच्या पथकाने अर्चना तिवारीला भोपाळला आणले. त्यानंतर या प्रकरणावर माध्यमांसमोर पोलिसांनी खुलासा केला. अर्चनाला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन केल्यानंतर आता कुटुंब तिला घेऊन कटनीला गेले आहे. अर्चनाला घेऊन जाण्यासाठी तिचे काका आले होते. कुटुंबाकडे जातानाचा अर्चना तिवारीचे फोटो समोर आले आहेत.
१३ दिवस बेपत्ता असलेल्या अर्चना तिवारीला तिने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होताना दिसतो. ती कुणाला नजरही मिळवत नव्हती. मोठ्या काकाच्या बाजूला ती उभी होती. काकाचा हात हातात घेऊन ती घाबरलेल्या अवस्थेत होती. तिची नजर खालीच होती. तिने कुणालाही पाहिले नाही. अर्चना तिवारीला लग्न करायचे नव्हते परंतु कुटुंबाने एका मुलासोबत तिचे लग्न ठरवले होते. इंदूरहून पॅकअप करून आता घरी ये असं कुटुंबाने तिला सांगितले होते. मात्र लग्नाऐवजी अर्चनाला तिचे करिअर बनवायचे होते. त्यामुळेच तिने हे मोठे पाऊल उचलले. याआधीही अर्चना तिवारीने घरच्यांनी आणलेली ५ लग्नाची स्थळे नाकारल्याचं समोर आले आहे.
पोलिसांसमोर उभं राहिलं होतं आव्हान
दरम्यान, चालत्या ट्रेनमधून अर्चना तिवारी बेपत्ता झाल्याने तिचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते. अर्चना इटारसीहून शुजालपूर, इंदूर, हैदराबाद, जोधपूर, दिल्ली आणि तिथून उत्तर प्रदेशच्या नेपाळ सीमेतून काठमांडूला पोहचली होती. तिची बॅग ट्रेनच्या बी ३ कोचमध्ये सापडली होती. त्यानंतर ८ ऑगस्टला तिच्या भावाने कटनी येथील रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी ५०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. इतकेच नाही तर एनडीआरएफ जवानांना घेऊन बुधनीपर्यंत जंगलात सर्च मोहिम हाती घेतली. नर्मदा नदी ३२ किमीवर भाग शोधून काढला. त्यानंतर अर्चनाच्या एका कॉलमुळे महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली.