रक्षाबंधन दिवशी २९ वर्षीय अर्चना तिवारी बेपत्ता झाली होती. ती १३ दिवसांनंतरही बेपत्ता आहे. मात्र, आता पोलिसांना तिच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. यामुळे अर्चनाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे. जीआरपीने ग्वाल्हेरच्या एका कॉन्स्टेबल राम तोमरला ताब्यात घेतले आहे. राम तोमरने अर्चना तिवारीसाठी तिकीट बुक केल्याचे उघड झाले आहे. अर्चनासोबत त्याचे काय संबंध आहे, त्याने इंदूरहून ग्वाल्हेरला तिकीट का बुक केले आणि त्याला अर्चनाचे गुपित माहित आहे का, हे जाणून घेण्यासाठी तोमरची चौकशी केली जात आहे.
अर्चनाच्या कुटुंबाने मानवी तस्करीचा संशय व्यक्त केला होता. तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवण्याची मागणी केली होती. इंदूर उच्च न्यायालयात वकील म्हणून काम करणारी आणि दिवाणी न्यायाधीशाची तयारी करणारी अर्चना ७ ऑगस्ट रोजी नर्मदा एक्सप्रेस ट्रेनने कटनीला रवाना झाली. अर्चनाचे शेवटचे ठिकाण भोपाळमधील राणी कमलापती स्टेशनवर सापडले, त्यानंतर तिच्या कुटुंबाने राणी कमलापती जीआरपी पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल केली.
इटारसी रेल्वेस्थानकावर शेवटचे लोकेशन
पोलिसांनी राणी कमलापती रेल्वे स्थानकापासून ते इटारसी आणि कटनीपर्यंतच्या परिसरात कसून चौकशी केली आहे. स्टेशन आणि आसपासच्या परिसरात बसवलेले सीसीटीव्ही स्कॅन केले, परंतु अद्याप अर्चनाचा कोणती माहिती लागलेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपासच्या सर्व रेल्वे स्थानके, बस स्टँड आणि ट्रॅव्हल एजन्सींना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. तपासात प्रत्येक पैलू तपासला जात आहे, मग तो अपघात असो, अपहरण असो किंवा इतर कोणतेही कारण असो. अर्चनाचे शेवटचे ठिकाण इटारसी रेल्वे स्थानक असल्याचे आढळून आले आणि तिचा मोबाईल तिथे बंद होता.
काही लोकांनी तिला इटारसी रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये पाहिले आहे. त्यानंतर ती कुठे गेली, काय घडले. आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असंही पोलिसांनी सांगितले.
तपासादरम्यान, आवश्यक तेथे इतर संबंधित एजन्सींची मदत घेतली जात आहे. दरम्यान, अर्चनाच्या कुटुंबाने पोलिस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याला मानवी तस्करीचा गुन्हा म्हटले आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. अर्चनाचे काका बाबू प्रकाश तिवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "हा मानवी तस्करीचे प्रकरण आहे परंतु पोलिस या दृष्टिकोनातून तपास करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.