Antilia Bomb Scare : मुंबईतून आणखी दोघांना NIA ने केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 21:10 IST2021-06-15T21:08:35+5:302021-06-15T21:10:34+5:30
Antilia Bomb Scare : न्यायालयाने या दोघांची २१ जूनपर्यंत एनआयएच्या कोठडीत रवानगी केली आहे.

Antilia Bomb Scare : मुंबईतून आणखी दोघांना NIA ने केली अटक
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी NIA ने मुंबईतूनच आणखी दोघांना अटक केली आहे. संतोष शेलार आणि आनंद जाधव अशी या दोघांची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांची २१ जूनपर्यंत एनआयएच्या कोठडीत रवानगी केली आहे.
अँटिलियाबाहेर एनआयएने या दोघांना स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटके ठेवल्याप्रकरणी एनआयएने मालाड परिसरातून अटक केली आहे. या प्रकरणाचा एनआयए तपास करत असून आतापर्यंत तीन पोलीस अधिकारी आणि एक पोलीस हवालदार या प्रकरणात निलंबित झाले आहेत. २५ फेब्रुवारी रोजी अँटिलियाबाहेर पोलिसांना जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. यानंतर काही दिवसांतच या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची देखील हत्या झाली. त्यामुळे मुंबईसह राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात मुंबई पोलिसांतील निलंबित सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे मुख्य आरोपी आहेत.
...म्हणून मनसुख हिरेनची हत्या?
वाझेच्या घरातून जप्त केलेल्या ६२ बुलेट्स या बनावट एन्काऊंटरसाठी आणल्या होत्या. त्याच्या या योजनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना होती का, त्याचा हा डाव कशामुळे फसला, या बाबी अद्याप अनुत्तरित आहेत. दरम्यान, मनसुख हिरेन हा गेल्या काही वर्षांपासून वाझेच्या नित्य सानिध्यात होता, त्याला सोबत घेऊन वाझेने गुन्ह्याचा कट रचला होता, मात्र ऐनवेळी एन्काऊंटरचा डाव रद्द झाल्याने त्याने हिरेनला थोड्या दिवसांसाठी या गुन्ह्यात अटक होण्यास सांगितले. मात्र, अब्रू जाण्याच्या भीतीने त्याने नकार दिला, त्याच्यामुळे आपले सर्व बिंग फुटेल, असे वाझेला वाटल्याने त्याने सहकाऱ्यासमवेत ४ मार्चला हिरेनची हत्या केल्याचा संशय अधिकाऱ्यांना आहे.