"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:24 IST2025-08-28T11:22:00+5:302025-08-28T11:24:10+5:30
हॉस्पिटलच्या सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, निक्की गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भाजली. विपिनचा चुलत भाऊ देवेंद्रने तिला हॉस्पिटलला आणले होते.

"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
ग्रेटर नोएडा - निक्की भाटी हुंडाबळी प्रकरणात आणखी एक नवीन वळण लागले आहे. नवनवीन विधाने आणि व्हायरल क्लीपमुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले आहे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामुळे मोठा प्रश्न उभा राहिला. हा व्हिडिओ निक्कीची बहीण कांचनने शूट केला. या व्हिडिओत भांडणाच्या आवाजात एक आवाज ऐकायला येतोय. "ताई, तू हे काय केलंय..." या ५ शब्दांनी पूर्ण घटनाक्रमाला संशयाच्या भोवऱ्यात ठेवले आहे. अखेर हे वाक्य कशाबद्दल आणि कोणत्या संदर्भाने म्हटलं गेले होते याचा पोलीस शोध घेत आहेत. दुसरीकडे निक्कीने हॉस्पिटलमध्ये जो जबाब दिला होता, तोदेखील महत्त्वाचा मानला जात आहे.
तपासात नवीन खुलासे
तपास यंत्रणांना निक्कीच्या खोलीतून ज्वलनशील पदार्थ सापडला. ज्याला फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे. त्याशिवाय अनेक व्हिडिओ समोर आलेत. ज्यातील एकात सासू दया, निक्की आणि विपिन यांच्या भांडणात दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत होती. परंतु खरी पंचाईत त्या व्हिडिओने झाली, जो कांचनने शूट केला होता. या गोंधळात अचानक एक आवाज ऐकायला येतो, हे तू काय केले...आता पोलीस या व्हिडिओची सत्यता आणि आवाजाची पडताळणी करत आहेत.
हॉस्पिटलमध्ये महत्त्वाचा जबाब
हॉस्पिटलच्या सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, निक्की गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने भाजली. विपिनचा चुलत भाऊ देवेंद्रने तिला हॉस्पिटलला आणले होते. निक्की वारंवार पाणी मागत होती, तिचा जीव गुदमरत असल्याचे ती म्हणत होती असं त्याने म्हटले. निक्कीने स्वत: हॉस्पिटलमध्ये सिलेंडर स्फोट झाल्यामुळे ती भाजली असं सांगितल्याचे समोर आले आहे. आता पोलीस त्या डॉक्टरचाही जबाब नोंदवत आहेत ज्याच्यासमोर निक्कीने हे सांगितले. हॉस्पिटलच्या मेमोमध्येही सिलेंडर स्फोटामुळे महिला जळली असल्याचं लिहिले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १२ हून अधिक जबाब नोंदवले आहेत. सीसीटीव्ही फुटेजही तपासले आहेत. ज्यात विपिन घटनेच्या काही वेळ आधी घरातून बाहेर पडला होता. यातच उत्तर प्रदेश महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत निक्कीच्या कुटुंबाची भेट घेतली. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात सोडवले जाईल, कुटुंबाला शक्य तितकी मदत करू असं आश्वासन त्यांनी दिले.
निक्कीच्या वहिनीने लावले आरोप
दरम्यान, या प्रकरणातच निक्कीची वहिनी आणि रोहित भाटीची पत्नी मीनाक्षीने खळबळजनक आरोप केले आहेत. हुंड्याच्या मागणीसाठी तिला वारंवार छळण्यात आले. २०१६ मध्ये लग्नाच्या पहिल्याच दिवशी सासरचं वातावरण विषारी वाटू लागले. पती रोहित, सासू, निक्की आणि कांचनने मिळून माझ्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला. इतकेच नाही तर मला मोबाईल वापरायलाही परवानगी नव्हती. सासरी एक दिवसही नीट जगता आले नाही. ६ महिने तिथे राहिल्यानंतर मी माहेरी परतली आणि तेव्हापासून इथेच राहतेय असा तिने निक्कीच्या घरच्यांवर आरोप केला.