नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची साडेचार लाखांनी फसवणूक!
By परिमल डोहणे | Updated: August 9, 2023 21:17 IST2023-08-09T21:17:05+5:302023-08-09T21:17:18+5:30
मिलिंद बुराडे याने विनायक पिपरे याला आपण किमान धनआरोग्य योजनेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा सुपरवायझर असल्याची माहिती दिली.

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणाची साडेचार लाखांनी फसवणूक!
चंद्रपूर : किमान धनआरोग्य योजनेत सुपरवायझर पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगार तरुणाची तब्बल चार लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. मिलिंद वासुदेव बुरांडे (४०, रा. चामोर्शी, जि. गडचिरोली), किशोर जगताप (४२, रा. जळका, ता. वरोरा) अशी अटकेतील आरोपींची नावे असून, अन्य एक फरार आरोपीचा तपास सुरु आहे. तर विनायक भाऊ पिपरे (४७, रा. कसरगट्टा, ता. पोंभुर्णा) असे फसवणूक झालेल्या बेरोजगाराचे नाव आहे.
मिलिंद बुराडे याने विनायक पिपरे याला आपण किमान धनआरोग्य योजनेमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा सुपरवायझर असल्याची माहिती दिली. तुलाही नोकरी लावून देतो. परंतु, कंपनीत साडेआठ लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. विनायक नोकरी मिळेल या उद्देशाने पैसे देण्यास कबूल झाला. त्याला मिलिंद बुराडे यांनी चंद्रपूर येथे एका हॉटेलमध्ये बोलवले. यावेळी मिलिंदसह किशोर जगताप व अन्य एक व्यक्ती होती.
या तिघांनी त्याला नोकरी लावून देण्यासाठी चार लाख ६५ हजार रुपये घेतले. मात्र, बरेच दिवस झाल्यानंतरही नोकरी लावून न दिल्याने विनायकने त्यांना विचारपूस केली. यावेळी टाळाटाळ करण्यात येत होती. त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. दरम्यान नव्यानेच रामनगर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक पदी रुजू झालेले दिपेश ठाकरे यांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून मिलिंद बुरांडे व किशोर जगताप यांना बुधवारी अटक केली. पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक दिपेश ठाकरे करीत आहेत.
आरोपीवर वरोरा, नागपूर ठाण्यातही गुन्हे दाखल
पोलिसांनी अटक केलेल्या किशोर जगताप याच्यावर वरोरा, चंद्रपूर, रामनगर तसेच नागपूर पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिस सूत्रांनी वर्तवली आहे. पुन्हा किती लोकांची फसवणूक यांनी केली याचा तपास पोलिसांकडून घेण्यात येत आहे.