जुन्या वैमनस्यातून चाकुने वार करीत केले गंभीर जखमी; जरीपटक्यातील घटना, तीन आरोपींना अटक
By दयानंद पाईकराव | Updated: May 3, 2023 15:39 IST2023-05-03T15:39:25+5:302023-05-03T15:39:29+5:30
यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.

जुन्या वैमनस्यातून चाकुने वार करीत केले गंभीर जखमी; जरीपटक्यातील घटना, तीन आरोपींना अटक
नागपूर : जुन्या वैमनस्यातून चाकुने वार करून एका व्यक्तीला गंभीर जखमी केल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरव दशरथ अंबाडे (वय ३०, रा. लष्करीबाग पाचपावली) हे आपला मित्र बंटी चौरे याच्या सोबत मोटारसायकलने लष्करीबागकडे जात होते. दरम्यान आरोपी टिटु उर्फ अदान तीर्थराज साखरे (वय २४, माता टेकडी, इंदोरा) याने आवाज देऊन गौरवला बोलावले. गौरव टिटुजवळ गेला असता त्याने जुन्या वैमनस्यातून गौरवला शिविगाळ केली. तसेच आरोपी सुजल तिर्थराज साखरे (वय १९), तीर्थराज जीवन साखरे (वय ५०), आर्यन उईके आणि लक्की निशाद यांनी संगणमत करून गौरवला हातबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली. आरोपी आर्यन उईके याने आपल्या जवळील चाकुने गौरवच्या शरीरावर व कंबरेखाली वार करून त्यास गंभीर जखमी केले. गौरवला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. जरीपटकाचे उपनिरीक्षक नानाभाऊ काकड यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी टिटु, सुजल आणि तीर्थराजला अटक केली असून आर्यन आणि लक्की अद्यापही फरार आहेत.