"तू मला भेटत का नाहीस..?"; प्रियकर बळजबरीनं प्रेयसीच्या घरात घुसला अन् राडा केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 00:15 IST2025-03-22T23:56:10+5:302025-03-23T00:15:46+5:30
पीडित तरुणीने लोहारा ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

"तू मला भेटत का नाहीस..?"; प्रियकर बळजबरीनं प्रेयसीच्या घरात घुसला अन् राडा केला
लोहारा (जि. धाराशिव) : तालुक्यातील एका गावात २१ वर्षीय तरुणीवर एकाने अत्याचार केल्याची घटना घडली. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलिस ठाण्यात शनिवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, पीडित तरुणी व आराेपी तरुण हे एकाच गावात राहतात. त्यामुळे दोघांची ओळख होती. मागील काही महिन्यांपासून संबंधित तरुण पीडितेच्या मागावर होता. यातून दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर पीडित मुलीने त्याला भेटण्यास नकार दिला. अस्वस्थ झालेला तरुण शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घुसला. तिच्या खोलीच्या दाराला आतून कडी लावून पीडितेला ‘तू मला का भेटत नाहीस’ असे म्हणत तिला शिवीगाळ व मारहाण करत तिच्यावर अत्याचार केला.
यावेळी पीडितेचा चुलत भाऊ, आई ही झोपेतून जागी होऊन घराबाहेर आले. त्यावेळी संबंधित आरोपीने पीडितेच्या भावाला, आईला शिवीगाळ करून धमकी देत पळून गेला. याबाबत पीडित तरुणीने लोहारा ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.