मुलगा होत नसल्याने मुंबईच्या 30 वर्षीय महिलेस चिंचघाटात मारण्याचा प्रयत्न
By श्रीनिवास नागे | Updated: September 1, 2022 21:20 IST2022-09-01T21:00:43+5:302022-09-01T21:20:57+5:30
प्रेमलता प्रद्युमनकुमार जेना (वय ३०, राहणार टी. अणुशक्तीनगर, मुंबई) असे महिलेचे नाव

मुलगा होत नसल्याने मुंबईच्या 30 वर्षीय महिलेस चिंचघाटात मारण्याचा प्रयत्न
सांगली/आटपाडी : मुलगा होत नसल्याच्या कारणातून मुंबईतील महिलेस आटपाडी तालुक्यात आणून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. हा प्रकार बुधवारी सकाळी काळेवाडी हद्दीतील चिंचघाट येथे उघडकीस आला. याबाबत जखमी महिलेने फिर्याद दिली असून तिचा पती व त्याच्या पात्रेवाडी (ता. आटपाडी) येथील सहकार्यास आटपाडी पोलिसांनीमुंबई येथून अटक केली आहे.
प्रेमलता प्रद्युमनकुमार जेना (वय ३०, राहणार टी. अणुशक्तीनगर, मुंबई) असे महिलेचे नाव असून, सांगलीतील शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. पती प्रद्युमनकुमार पितासाब जेना (राहणार मानखुर्द, मुंबई) व संपतराव एकनाथ गायकवाड (मूळ राहणार पत्रेवाडी, सध्या राहणार मानखुर्द, मुंबई) यांना अटक केली आहे.
जखमी प्रेमलता हिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती प्रद्युमनकुमार यांच्याशी विवाहानंतर तिला दोन मुली झाल्या आहेत. सध्या ती तिसऱ्या वेळेस गरोदर आहे. मात्र, प्रद्युमनकुमार यास मुलगाच हवा असल्याने त्याने गर्भलिंगनिदान करावयाचे आहे, असे सांगून तिला गाडीतून मंगळवारी आटपाडीतील चिंचघाट परिसरात आणले. यावेळी त्यांच्यासोबत संपतराव गायकवाड होता. या ठिकाणी प्रद्युमनकुमार याने प्रेमलता हिचा दोरीने गळा आवळला. यात ती काही काळ बेशुद्ध पडली. ती मृत झाली आहे असे समजून दोघांनीही त्या ठिकाणाहून पोबारा केला.