AMU Teacher Death: उत्तर प्रदेशातील प्रतिष्ठित अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी परिसरात एका कॉम्प्युटर शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. राव दानिश असे या मृत शिक्षकाचे नाव असून, ते गेल्या ११ वर्षांपासून कॅम्पसमधील एबीके हायस्कूलमध्ये होते. या घटनेमुळे संपूर्ण युनिव्हर्सिटी परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. शिक्षक दानिश राव यांच्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. घटनास्थळाजवळ बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हल्लेखोर दिसत आहेत.
CCTV मध्ये कैद झालेला मृत्यूचा थरार
समोर आलेल्या १ मिनिट ३ सेकंदाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हत्येचा अत्यंत भयावह प्रकार दिसून येत आहे. राव दानिश हे एका व्यक्तीसोबत फिरत असताना अचानक त्यांच्यावर पहिली गोळी झाडण्यात आली. गोळी लागताच दानिश जमिनीवर कोसळले. त्यानंतर मारेकऱ्याने अत्यंत क्रूरपणे त्यांच्यावर एकामागून एक ६ गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे, गोळ्या झाडल्यानंतर मारेकरी पळून न जाता तिथेच थांबला. त्याने वाकून पाहिले की दानिश यांचा मृत्यू झाला आहे की नाही. जेव्हा त्याला खात्री पटली की दानिश यांचा मृत्यू झाला आहे, तेव्हाच तो तिथून पसार झाला.
शांत स्वभावाचे शिक्षक आणि राजकीय संबंध
राव दानिश हे त्यांच्या शिस्तप्रिय आणि शांत स्वभावासाठी विद्यार्थी आणि सहकाऱ्यांमध्ये ओळखले जात होते. ते मूळचे बुलंदशहरचे रहिवासी असून त्यांचे सासरे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. हायप्रोफाईल कुटुंबाशी संबंधित असूनही त्यांची कोणाशीही शत्रूता नव्हती, असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणातून झाली, याचे गूढ वाढले आहे.
तपासासाठी ६ पथके तैनात
कॅम्पसमध्ये झालेल्या या हत्येमुळे प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अलिगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ६ विशेष पथके तयार केली आहेत. सीसीटीव्ही फुटेज जरी धुसर असले, तरी तांत्रिक मदतीने मारेकऱ्याची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
एएमयू कॅम्पसमध्ये भीतीचे सावट
अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे कॅम्पस हे शैक्षणिक वातावरणासाठी ओळखले जाते, मात्र एका शिक्षकाची अशा प्रकारे हत्या झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कॅम्पसच्या सुरक्षा व्यवस्थेवरही आता टीकेची झोड उठत आहे.
Web Summary : An AMU teacher, Rao Danish, was shot dead on campus. CCTV footage shows the assailant firing multiple shots and ensuring his death. Police have launched an investigation amid rising safety concerns.
Web Summary : एएमयू परिसर में शिक्षक राव दानिश की गोली मारकर हत्या कर दी गई। सीसीटीवी फुटेज में हमलावर कई गोलियां चलाते और उसकी मौत सुनिश्चित करते हुए दिख रहा है। सुरक्षा चिंताओं के बीच पुलिस ने जांच शुरू कर दी है।