अमरावती मारहाण प्रकरण: ठाणेदाराची तडकाफडकी बदली, दोन अंमलदार निलंबित
By प्रदीप भाकरे | Updated: November 12, 2022 19:16 IST2022-11-12T19:16:03+5:302022-11-12T19:16:38+5:30
हॉस्पिटलमधून आरोपी पळून गेल्याने करण्यात आली कारवाई

अमरावती मारहाण प्रकरण: ठाणेदाराची तडकाफडकी बदली, दोन अंमलदार निलंबित
अमरावती: आठ दिवसांपूर्वी फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला चढवला होता. यातील एक आरोपी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान गंभीर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिसांची तैनाती करण्यात आली होती. मात्र हा आरोपी शुक्रवारी रुग्णालयातून पळून गेला. या प्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी शनिवारी फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांची तडाकफडकी बदली केली असून दोन पोलिसांना निलंबित केले आहे. फ्रेजरपुराचे ठाणेदार अनिल कुरळकर यांची बदली विशेष शाखेला केली असून फ्रेजरपुराचे नविन ठाणेदार म्हणून विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांना जबाबदारी दिली आहे. तसेच फ्रेजरपुरा ठाण्यातील पोलीस अंमलदार नईम बेग व संजय डेरे या दोन अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे.
नितीन ऊर्फ बबलू भगवंत गाढे (३६, रा. यशोदानगर) असे रुग्णालयातून परस्पर निघून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. ६ नोव्हेंबरला सांयकाळी यशोदानगर परिसरातील एका वाईन शॉपीवर बबलू गाढे व गोलू चौधरी या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर चाकू हल्ला चढवला होता. त्यामुळे पोलिसांनी परस्पर विरोधी तक्रारीवरुन दोघांवरही प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान या हल्ल्यात बबलूच्या पोटात चाकू लागला होता. त्यामुळे त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मागील पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नव्हती मात्र प्रकरण गंभीर असल्यामुळे फ्रेजरपुरा पोलिसांनी या खासगी रुग्णालयात त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी दोन पोलिस अंमलदार तैनात केले होते. असे असतानाही बबलू गाढे शुक्रवारी सांयकाळी रुग्णालयातून पसार झाला. या प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेवून ठाणेदारांची बदली करुन दोन अंमलदारांना तडकाफडकी निलंबित केले आहे.