आधीच गर्दी, त्यात बेस्ट धडकली; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, चालकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2023 06:04 IST2023-09-17T06:03:21+5:302023-09-17T06:04:04+5:30
अपघातप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा

आधीच गर्दी, त्यात बेस्ट धडकली; २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, चालकाला घेतले ताब्यात
मुंबई - मालवणीच्या गेट क्रमांक ८ जवळ असलेल्या डेपो परिसरात शनिवारी सकाळी फरहीन रिझवी (२०) या तरुणीचा बेस्ट बसच्या धडकेत मृत्यू झाला. या प्रकरणी चालक महादेव ससाणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.सदर अपघात हा सकाळी घडला. चालकाने डेपोजवळ बस आणली आणि त्यातून प्रवासी खाली उतरले. तो ही बस डेपोच्या आतमध्ये वळवत असतानाच फरहिन पुढच्या चाकात आली आणि गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. दरम्यान हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे घडला याचा तपास पोलिस करत असून फरहिनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
वाहतूककोंडीमुळे बसचालक हैराण
काही महिन्यांपूर्वी एक गरोदर महिलादेखील अशाच प्रकारे गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी भाजी मार्केटच्या चार रांगांमुळे ग्राहकांची गर्दी होते आणि नेमकं चालायचं कुठून याबाबत स्थानिकांमध्ये संभ्रम उडतो. तसेच पालिकेकडून सुरू असलेल्या कामांसाठी योग्य बॅरिकेटिंग नसून याठिकाणी सुरक्षारक्षकही नेमण्यात आलेला नाही. त्यात दुप्पट तिप्पट अनधिकृत पार्किंगची भर पडते. या सगळ्यामुळे वाहतूककोंडी निर्माण होऊन बसचालकांना गाडी चालवताना अडथळा निर्माण होतो.