नवा ट्विस्ट! अतुल सुभाषचा भाऊ पोलीस तपासात करत नाही मदत; अजून दिले नाहीत पुरावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:27 IST2024-12-17T11:27:26+5:302024-12-17T11:27:59+5:30
Atul Subhash : अतुलचा भाऊ विकास मोदी तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपास अधिकाऱ्यांसमोर पुरावे देण्यासाठी हजर झालेला नाही.

फोटो - आजतक
बंगळुरू एआय इंजिनिअर अतुल सुभाष याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस अतुलची पत्नी निकिता सिंघानियासह सर्व आरोपींचे जबाब नोंदवत आहेत. मात्र अतुलचा भाऊ विकास मोदी तपासात सहकार्य करत नसल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो तपास अधिकाऱ्यांसमोर पुरावे देण्यासाठी हजर झालेला नाही. त्याला चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली होती.
सुसाईड नोटमधील हस्ताक्षर अतुल सुभाषच्या हस्ताक्षराशी जुळतं की नाही याची पुष्टी करण्यासाठी बंगळुरू पोलिसांना पुरावे गोळा करावे लागणार आहेत. अतुलचा भाऊ विकास याला तक्रारीत नोंदवलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ पुरावे द्यावे लागतील, त्यात अतुलने लिहिलेल्या पत्राचाही समावेश आहे. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणी पीडित कुटुंबीय सातत्याने न्यायाची मागणी करत आहेत. अतुलची शेवटची इच्छा होती की, त्याला न्याय मिळावा, न्यायालयाने त्याच्या पत्नीला आणि तिच्या कुटुंबीयांना योग्य ती शिक्षा द्यावी. त्यामुळेच न्याय न मिळाल्यास आपले अस्थी न्यायालयासमोरील गटारात फेकून द्या, असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा अस्थिकलश जपून ठेवला आहे.
निकिता सिंघानियाने पती अतुल सुभाषवर उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे अनेक गुन्हे दाखल केल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. बंगळुरू पोलिसांनी शनिवारी निकिता, तिची आई आणि भावाला गुरुग्राम आणि प्रयागराज येथून अटक केली. स्थानिक न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अतुल सुभाषने मृत्यूपूर्वी २६ पानी सुसाईड नोट लिहून एक व्हिडीओही बनवला होता.