अहमदनगर व्हाया मुंबई; पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 21:35 IST2019-07-09T21:32:18+5:302019-07-09T21:35:13+5:30
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अहमदनगर पोलीस करत असल्यामुळे आरोपीचा ताबा त्यांना देण्यात आला आहे.

अहमदनगर व्हाया मुंबई; पोलिसांनी अपहरणाचा डाव उधळला
मुंबई - वडाळा पोलिसांनी अवघ्या एका तासात मुलीच्या अपहरणाचा डाव उधळून लावत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. काकासाहेब ढगे (२०) असं या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अहमदनगर पोलीस करत असल्यामुळे आरोपीचा ताबा त्यांना देण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये राहणारी मुलगी १५ वर्षीय आहे. आई-वडिलांचे लहानपणी निधन झाल्यामुळे अल्पवयीन मुलगी तिच्या मावशीकडे राहत होती. काही दिवसांपूर्वी मुलगी शेतात एकटी काम करत असताना ढगेने तिला धमकावून पळवून मुंबईत आणले. त्याने प्रथम मुलीला बीडच्या आष्ठी येथे नातेवाईकांकडे नेले. ढगेने मुलगी पळवून आणल्याचे कळाल्यानंतर नातेवाईकांनी त्याला हाकलून लावले. तेथे दोन आठवडे थांबल्यानंतर तो तिला घेऊन पोकरी अहमदनगर येथे नातेवाईंकांकडे गेला. तेथे तो महिनाभर राहिला. पोकरीत त्याने लाकूड व्यवसाय सुरू केला होता. मात्र तेथेही नातेवाईकांना त्याच्यावर संशय आल्यानंतर त्याने तेथून मुलीला घेऊन पळाला. नंतर त्याने पंढरपूर गाठले. त्या ठिकाणी तो मित्राच्या घरी दोन दिवस राहिला. त्यानंतर पुन्हा पोकरीला येऊन नातेवाईकांना विनवण्या करून थांबला. १० दिवसानंतर तो मुलीला घेऊन मुंबईच्या वडाळा परिसरात आला. ही बातमी मुलीच्या घरातल्यांना कळाल्यानंतर त्यांनी रविवारी वडाळा पोलीस ठाण्यात येत पोलीस उपनिरीक्षक दत्ताराम कोकणे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ढगेने वडाळातील मिठाघर परिसरात मुलीला पळवून आणले असल्याचे सांगितले. पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने एका तासात ढगेचा शोध लावत त्याला पोलीस ठाण्यात आणले. पीडित मुलीचा ताबा तिच्या नातेवाईंकांना दिला असून ढगेचा ताबा पुढील तपासासाठी अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तपासात ढगेने दोन लग्न केली असून दोन्ही बायका त्याला सोडून गेल्या असल्याचं उघडीकस आलं आहे. त्याने मुलीच्या बालबुद्धीचा फाय़दा घेऊन तिला धमकवून पळवून आणल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.