गुजरातच्या अहमदाबादमधून ९ कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ३ वर्षात १०० हून अधिक लोकांची मोठी फसवणूक करून फरार झालेल्या महिलेला चांदखेडा पोलिसांनी सुरतमधून अटक केली आहे. या फसवणूक करणाऱ्या महिलेने ५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर २०% व्याज आणि ५ लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीवर २३% व्याज देण्याचे आमिष दाखवून ग्रो मनी नावाची कंपनी स्थापन करून लोकांना मूर्ख बनवलं होतं.
६ महिन्यांपासून फरार असलेली आणि चांदखेडा येथे राहणारी जिगिशा जाधव हिने फसवणूक करण्याच्या उद्देशाने ग्रो मनी नावाची ट्रेडिंग कंपनी सुरू केली होती. अहमदाबादमध्ये राहणाऱ्या ४२ वर्षीय सपना पिठाडियासह ३५ हून अधिक लोकांनी तिच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. जिगिशाने यापैकी एका गुंतवणूकदाराला ५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर २०% आणि ५ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीवर २३% परतावा देण्याचे आमिष दाखवून १.८८ कोटी रुपये गुंतवायला लावले होते, तर तिने इतर दोन गुंतवणूकदारांना २ कोटी २० लाख ५० हजार रुपये गुंतवायला लावले होते परंतु निश्चित परतावा दिला नाही.
घराला कुलूप लावून फरार
अहमदाबादमधील चांदखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक निकुंज सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिगिशाने घरातून ग्रो मनी नावाची कंपनी सुरू केली आणि महिला, ओळखीच्या आणि त्यांच्या जवळच्या सोसायटीत राहणाऱ्या सुमारे १०० लोकांना २० ते २३ टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवलं. सुरुवातीला जिगिशाने आश्वासनाप्रमाणे परतफेड देण्यास सुरुवात केली होती. पण त्यानंतर अचानक ६ महिन्यांपूर्वी घराला कुलूप लावून फरार झाली.
३ फ्लॅट आणि ५० लाखांचं सोनं
फसवणुकीतून मिळालेल्या पैशातून जिगिशाने अहमदाबाद, सुरत येथे ३ फ्लॅट आणि ५० लाखांहून अधिक किमतीचं सोनं खरेदी केल्याचं आढळून आलं. ती तिच्या ८ वर्षांच्या मुलासह एकटीच राहत होती. सुरुवातीला ती झुंडल येथील एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. नंतर तिने एका शेअर बाजार कंपनीत काम करू लागली. त्यानंतर तिने ग्रो मनी नावाची कंपनी सुरू केली आणि २३% पर्यंत परतफेड देण्याचं आमिष दाखवून लोकांची ९ कोटींची फसवणूक केली आहे.