डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 15:35 IST2026-04-11T15:33:37+5:302026-04-11T15:35:42+5:30
मुलींनी डोसा खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याची तक्रार केली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला होता. मात्र जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे.

डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
गुजरातच्या अहमदाबादमध्ये प्रजापती कुटुंबातील दोन लहान मुलींच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सुरुवातीला ही घटना 'फूड पॉयझनिंग'शी जोडून पाहिली जात होती. मुलींनी डोसा खाल्ल्यानंतर प्रकृती बिघडल्याची तक्रार केली आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला होता. मात्र जसजसा तपास पुढे सरकत आहे, तसतसं हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचं होत चाललं आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने केला असून कुटुंबातील सदस्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलींचे वडील विमल प्रजापती यांची दोन तास चौकशी करण्यात आली, तर गुन्हे शाखेने देखील त्यांची वेगळी चौकशी केली. या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे, हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.
मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
चौकशीदरम्यान विमल प्रजापती यांनी स्वतःवर असलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून आपण मुलींची हत्या केली नसल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या मते, ही घटना एखाद्या खाद्यपदार्थातील विषारी घटकामुळे घडली असावी. दुसरीकडे मुलींची आई भावना सध्या रुग्णालयात दाखल आहे. तिची प्रकृती सुधारल्यानंतर पोलीस तिचीही चौकशी करतील, ज्यातून प्रकरणाचे अनेक महत्त्वाचे पैलू समोर येऊ शकतात.
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
डायरीतील मजकुरामुळे बदलली तपासाची दिशा
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलींच्या आईची एक डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे, ज्यामध्ये मुलाच्या जन्माबाबत काही गोष्टी लिहिलेल्या आहेत. या डायरीतील मजकुरामुळे तपासाची दिशा आता पूर्णपणे बदलली आहे. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या जबाबांमध्येही तफावत आढळून आली आहे, ज्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण अधिक गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली आहे.
आजी-आजोबांची होणार चौकशी
पोलीस आता हे गूढ उकलण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करण्याच्या तयारीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणा 'लाय डिटेक्टर्स टेस्ट' घेण्यावर विचार करत आहे. याअंतर्गत मुलींच्या आई-वडिलांसह आजी-आजोबांचीही चौकशी केली जाऊ शकते. त्यांच्यावरही संशय आहे. मात्र, ही प्रक्रिया एफएसएल (FSL) अहवाल आल्यानंतरच सुरू केली जाईल. सध्या पोलीस फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या रिपोर्टची वाट पाहत आहेत, जेणेकरून नेमकं कारण स्पष्ट होऊ शकेल.