डोसा पीठामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू; २०० जणांनी खाल्लं पण काहीच झालं नाही, तपासाला वेगळंच वळण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 11:51 IST2026-04-08T11:14:28+5:302026-04-08T11:51:06+5:30

अहमदाबादमध्ये डोसा खाल्ल्यानंतर दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Ahmedabad Case Investigation Deepens After 200 People Consume Same Batter Without Illness Infant Death Raises Poisoning Suspicions | डोसा पीठामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू; २०० जणांनी खाल्लं पण काहीच झालं नाही, तपासाला वेगळंच वळण

डोसा पीठामुळे दोन चिमुकल्यांचा मृत्यू; २०० जणांनी खाल्लं पण काहीच झालं नाही, तपासाला वेगळंच वळण

Ahmedabad Food Poisoning: डोसा खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा होऊन एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना अहमदाबादच्या चांदखेडा भागात घडली आहे. राहा (३ महिने) आणि मिश्री (४ वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत. मात्र, या तपासात आता  काही मुद्दे समोर आले आहेत, ज्यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

मारुती प्लाझा सोसायटीत राहणारे विमल प्रजापती १ एप्रिल रोजी आयओसी रोडवरील घनश्याम डेअरीतून ३ किलो डोशाचे पीठ घेऊन आले होते. कुटुंबाने १ आणि २ एप्रिल रोजी या पीठाचे डोसे खाल्ले. त्यानंतर विमल, त्यांची पत्नी भावना आणि दोन्ही मुलींना उलट्यांचा त्रास सुरू झाला. उपचारादरम्यान ४ वर्षांच्या मिश्रीचा मृत्यू झाला. कुटुंबाने सुरुवातीला ही सामान्य विषबाधा समजून कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेविना मिश्रीवर अंत्यसंस्कार केले. मात्र, ४ एप्रिल रोजी अवघ्या ३ महिन्यांच्या राहाचाही मृत्यू झाला आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.

३ महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढला

या प्रकरणातील सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे ३ महिन्यांच्या राहाचा मृत्यू. पोलिसांनी तपासासाठी राहाचा मृतदेह दफन केल्यानंतर ४ दिवसांनी मॅजिस्ट्रेट आणि एफएसएलच्या उपस्थितीत बाहेर काढला आहे. या चिमुकलीचे पोस्टमार्टम आणि फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, ३ महिन्यांची राहा केवळ आईच्या दुधावर होती. तिने डोसा खाल्ला नव्हता. मग तिचा मृत्यू कसा झाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

२०० जणांनी खाल्लं पीठ; डेअरी मालकाचा दावा 

ज्या घनश्याम डेअरीतून पीठ आणले होते, त्या मालकाने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले की, त्याच दिवशी तसेच पीठ जवळपास २०० लोकांनी नेले होते, मात्र कुणालाही त्रास झाला नाही. कुटुंबाने ३ किलो पीठ विकत घेतले होते, त्यापैकी २.७ किलो पीठ त्यांनी परत केले. म्हणजेच फक्त ३०० ग्रॅम पीठाचा वापर झाला होता. इतक्या कमी प्रमाणात पीठ खाल्ल्याने संपूर्ण कुटुंबाला विषबाधा कशी झाली याचाही तपास सुरु करण्यात आला आहे.

घातपाताची शक्यता?

गुन्हे शाखेचे अधिकारी आता सर्व बाजूंनी तपास करत आहेत. डेअरीच्या पीठात दोष नसल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत असल्याने, पोलिसांनी इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. कुटुंबातील कोणालातरी मारण्यासाठी अन्नात विष मिसळले गेले होते का? पीठ घरी नेल्यानंतर त्यात काही दूषित घटक मिसळले गेले का?कुटुंबाने पीठासोबत इतर काही खाल्ले होते का? याचा तपास पोलीस करत आहेत.

पती पत्नीची प्रकृती स्थिर

दरम्यान, विमल आणि भावना प्रजापती यांच्यावर केडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. पोलिसांनी डेअरीचे सीसीटीव्ही फुटेज आणि घराची झडती घेतली आहे, मात्र अद्याप काहीही संशयास्पद सापडलेले नाही. आता सर्वांचे लक्ष विसेरा रिपोर्ट आणि पोस्टमार्टमच्या अहवालाकडे लागले आहे.

"आम्ही सर्व शक्यता तपासत आहोत. पीठात दोष असण्याची शक्यता कमी वाटते कारण इतर कुणालाही त्रास झालेला नाही. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल," अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे संपूर्ण खळबळ उडाली असून, बाहेरचे अन्नपदार्थ खाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title : डोसा बैटर से मौतें: दो बच्चों की मौत, जांच में चौंकाने वाला मोड़।

Web Summary : अहमदाबाद में डोसा बैटर से कथित जहर से दो बच्चियों की मौत हो गई। जांच में पता चला कि अन्य लोगों ने भी वही बैटर खाया, जिससे किसी गड़बड़ी का संदेह बढ़ गया। पुलिस सभी पहलुओं की जांच कर रही है।

Web Title : Dosa batter deaths: Two children die, investigation takes surprising turn.

Web Summary : Two young girls died in Ahmedabad after suspected food poisoning from dosa batter. Investigation reveals others ate the same batter without issue, raising suspicion of foul play. Police investigate all angles.