अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 23:59 IST2025-12-14T23:56:05+5:302025-12-14T23:59:28+5:30
अपहरण झालेल्या व्यक्तीकडून पोलिसांनी समजून घेतला घटनाक्रम

अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: वाशिम येथून एका ज्येष्ठ व्यक्तीचे अपहरण करून अहिल्यानगरमार्गे पुण्याच्या दिशेने जात असलेल्या आरोपींचा पाठलाग करत नगर पोलिसांनी नागापूर येथील पुलावर रात्री दहा वाजेच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली. पोलीस व आरोपींमध्ये झटापट झाल्याने नागापूर पूलावर बराच वेळ हा थरार रंगला होता.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, वाशिम येथून एका ज्येष्ठ व्यक्तीचे चार जणांनी अपहरण केले. ते छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर मार्गे पुण्याला जात आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर रोडवरील शेंडी बायपास चौकात सापळा रचला आणि तिथून चारचाकीचा पाठलाग केला. आरोपींना पोलीस आपला पाठलाग करत असल्याची कुणकुण लागली. त्यांनी भरधाव कार चालवत पुण्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे अहिल्यानगर- मनमाड रोडवरील दुध डेअरी चौकात एमआयडीसी पोलिसांनीही सापळा रचला होता. आरोपींनी एमआयडीसी पोलिसांना हुलकावणी देत त्यांची कार नगरच्या दिशेने वळवली.
एमआयडीसी पोलिसांनी आरोपींच्या चारचाकीचा पाठलाग केला. आरोपींनी पोलिसांच्या गाडीला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांची कार नागापूर पुलावरील दुभाजकाला धडकली. यावेळी पोलिसांनी पाठलाग करत दोघा आरोपींसह चारचाकी ताब्यात घेतली. अपहरण झालेल्या व्यक्तीलाही पोलिसांनी सोबत घेतले असून त्यांच्याकडून घटनाक्रम समजून घेतला. त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. दरम्यान, वाशिम येथील पोलीसही अहिल्यानगरला दाखल झाले असून, हे प्रकरण नेमके काय आहे, याचा पोलीस शोध घेत आहेत.