मुलं मोठी झाली की आई-वडील मुलांना चांगल्या मार्गाने पैसे कमवण्याचा सल्ला देतात. आता एक धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांनी सांगितलेल्या या गोष्टीचा उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एका बीएससी विद्यार्थ्यावर इतका परिणाम झाला की, त्याने पैसे कमविण्यासाठी लगेच बँक लुटण्याचा कट रचला. यासाठी त्याने युट्यूबवर व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली.
एकट्याने बँक लुटण्यासंबंधीचे व्हिडीओ पाहिले. प्लॅन केल्यावर तो बँक लुटण्यासाठी गेला. पण त्याआधीच त्याला बँक कर्मचाऱ्यांनी पकडलं. कानपूरमध्ये, शनिवारी सकाळी १० वाजता, एक तरुण घाटमपूरमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेबाहेर सायकलवरून आला. यानंतर तो पिस्तूल, चाकू आणि सर्जिकल ब्लेड घेऊन बँकेत घुसला. जेव्हा गार्डने त्याला थांबवलं तेव्हा त्याने गार्डवर चाकूने हल्ला केला.
बँक मॅनेजर, कॅशियर आणि इतर बँक कर्मचाऱ्यांनी मोठ्या कष्टाने त्या तरुणाला पकडलं आणि त्याला दोरीने बांधलं. यावेळी बँक व्यवस्थापकासह तीन बँक कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणात, आरोपी तरुणही जखमी झाला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
आरोपी शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि त्याचा मोबाईल तपासला तेव्हा एक धक्कादायक घटना समोर आली. लविश मिश्रा नावाचा हा तरुण बीएससी तिसऱ्या वर्षासह आयटीआय करत होता. त्याला लवकर पैसे कमवायचे होते, म्हणून त्याने बँक लुटण्याची योजना आखली.
आरोपीचा मोठा भाऊ अभय मिश्रा दिल्लीतील एका खासगी कंपनीत काम करतो आणि त्याचे वडील अवधेश मिश्रा शेतकरी आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. म्हणून जेव्हा तो पैसे मागायचा तेव्हा त्याचे वडील त्याला स्वतः काही काम करायला सांगायचे.
पैसे कमवण्यासाठी, त्या तरुणाने शॉर्टकट पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आणि युट्यूबवर बँक दरोड्याचे व्हिडीओ पाहण्यास सुरुवात केली. तो गेल्या एक वर्षापासून युट्यूबवर बँक दरोड्याचे व्हिडीओ पाहत होता. विशेष म्हणजे त्याने बहुतेकदा असे व्हिडीओ पाहिले होते ज्यात कोणीतरी एकट्याने बँक लुटली होती.
तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडिया लुटण्याची योजना आखली. एकट्याने बँक लुटण्यासाठी, त्या तरुणाने त्याच्या तळहाताखाली सर्जिकल ब्लेड बांधला. आरोपीने थेट बँकेच्या गार्डवर चाकूने हल्ला केला. पाठीवर एक बॅग लटकवली होती ज्यामधून तो पैसे घेऊन जाऊ इच्छित होता. मात्र त्याआधीच गार्डने धाडस दाखवलं आणि पुढे जाऊन बँक कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुलाला पकडलं.