after receiving the phone call police dig out dead body of baby girl | ठाणेदारांना एक फोन आला अन् पोलिसांनी चिमुकलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला!
ठाणेदारांना एक फोन आला अन् पोलिसांनी चिमुकलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला!

यवतमाळ : सातवीही मुलगी झाल्याने तिला ठार मारल्याचा संशय व्यक्त करण्यात आल्यानं मुलीचा पुरलेला मृतदेह महसूल व पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं. घाटंजी तालुक्यातील करमनामध्ये हा प्रकार घडला.

करमना गावातील अशोक श्यामराव शिंदे यांना २८ जून रोजी मुलगी झाली. त्याआधी त्यांना सहा मुलीच झाल्या होत्या. १५ जुलैला त्यांच्या सातव्या मुलीचा मृत्यू झाला. तिचा दफनविधीही पार पडला. दरम्यान, घाटंजीचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांना निनावी फोन आला. करमना गावातील बालिकेचा मृत्यू नैसर्गिक नाही, तिला नख लावून ठार मारण्यात आलं, अशी माहिती फोन केलेल्या व्यक्तीनं दिली. ही माहिती ऐकताच ठाणेदार शुक्ला यांनी प्राथमिक माहिती काढून मृत्यू झाल्याची खातरजमा केली. त्यानंतर उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची मृतदेह उकरण्यासाठी परवानगी घेतली. 

ठाणेदार शुक्ला व नायब तहसीलदार राठोड घटनास्थळी पोहोचले. त्यांच्या उपस्थितीत १८ दिवसांच्या बालिकेचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला. अद्याप तरी शवविच्छेदन झालेलं नाही. शवचिकित्सा अहवालानंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येईल, असे घाटंजीचे ठाणेदार दिनेश शुक्ला यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यातील मृत बालिकेचे वडिल रोजगाराच्या शोधात छत्तीसगडला गेल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं.
 


Web Title: after receiving the phone call police dig out dead body of baby girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.