हत्येच्या आरोपाखाली ४ जण जेलमध्ये बंद; १८ महिन्यांनी मृत महिला परतली, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 17:20 IST2025-03-20T17:19:59+5:302025-03-20T17:20:52+5:30
या मृत महिलेचे कुटुंबाने अंत्यसंस्कार केले. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ४ जणांवर कथित हत्येचा आरोप होऊन त्यांना अटक करण्यात आली होती

हत्येच्या आरोपाखाली ४ जण जेलमध्ये बंद; १८ महिन्यांनी मृत महिला परतली, अन्...
झाबुआ - मध्य प्रदेशात अजब गजब प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी एक महिला जिचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाल्याचं मानलं होतं. अचानक ती परत आली आहे. ही महिला परत आल्याने तिचं कुटुंब, शेजारी आणि पोलीसही हैराण झालेत. या कुटुंबाने तिच्यावर अंत्यसंस्कारही केले होते. विशेष म्हणजे या महिलेच्या कथित हत्या प्रकरणी ४ जण जेलमध्ये बंद आहेत. ही महिला मंदसौरच्या नवाली गावात राहत होती. ती पुन्हा आलीय यावर अद्यापही कुणाचा विश्वास बसत नाही. महिला परतल्यानंतर तिच्या वडिलांनी तातडीने पोलीस स्टेशन गाठत त्यांना ही बाब कळवली.
या घटनेबाबत सागर पोलीस स्टेशन अधिकारी तरूणा भारद्वाज म्हणाल्या की, ही महिला मंदसौरहून शाखरूख नावाच्या एका व्यक्तीसोबत निघून गेली होती. २ दिवसानंतर कोटा इथं त्याला आणखी एका व्यक्तीकडे सोपवले गेले. तेव्हापासून ती कोटा येथे राहत होती. परंतु दीड वर्षाने ती त्या माणसांच्या तावडीतून पळून घरी परतण्यास यशस्वी ठरली आहे. या महिलेने तिची ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, मतदान कार्डासारखे अन्य कागदपत्रे दाखवली. हे प्रकरण आम्ही झाबुआच्या थांदला पोलीस स्टेशनला सोपवले आहे ज्यांनी या महिलेच्या हत्येचा तपास केला होता असं त्यांनी सांगितले.
महिलेला २ मुले...
या महिलेला २ मुले असून दीड वर्षांनी ती मुलांना भेटली. महिला परत जिवंत आल्याने कुटुंबाला आनंद झाला आहे. ती थांदला पोलीस स्टेशनलाही गेली. तिचे वडील रमेश यांनी २०२३ साली एका भयंकर अपघातात मृत झालेल्या महिलेची ओळख त्यांची मुलगी असल्याचं केले होते. या मृतदेहावर तिच्या नावाचा टॅटू होता आणि दंडावर काळा धागाही होता. त्यामुळे ही माझीच मुलगी आहे असं वडिलांनी पोलिसांना सांगितले होते.
४ जणांवर हत्येचा आरोप
या मृत महिलेचे कुटुंबाने अंत्यसंस्कार केले. या महिलेच्या मृत्यूप्रकरणी ४ जणांवर कथित हत्येचा आरोप होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यात इमरान, शाहरूख, सोनू आणि एजाज यांचा समावेश असून गेली दीड वर्ष हे जेलमध्ये आहेत. पोलिसांनी महिलेचा मृतदेह कुटुंबाला सोपवला. त्यानंतर कुटुंबाने तिच्यावर विधी परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. आता ती महिला परत आल्याने पोलीस आणि कुटुंब दोन्ही हैराण झाले. पोलीस आता या प्रकरणाची पुन्हा चौकशी करत असून महिला तस्करीचं हे नेटवर्क आहे का याचा शोध घेतला जात आहे.