After being released on bail, the accused raped on 16-year-old girl again | जामिनवर सुटताच आरोपीचा १६ वर्षीय मुलीवर परत अत्याचार

जामिनवर सुटताच आरोपीचा १६ वर्षीय मुलीवर परत अत्याचार

ठळक मुद्देआरोपीला न्यायालयाने सशर्त जामीन दिल्यापासून तो जेलमधून बाहेर आला आहे.

औरंगाबाद: बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर असलेल्या नराधमाने तक्रारदार १६ वर्षीय तरूणीचे अपहरण करून निर्जनस्थळी नेल्यानंतर पुन्हा अत्याचार केल्याची खळबळजनक घटना छावणी परिसरात ६ आॅक्टोबर रोजी रात्री घडली. याविषयी पीडितेची तक्रार प्राप्त होताच छावणी पोलिसांनी झटपट कारवाई करीत आरोपी नराधमाला बेड्या ठोकल्या.

सागर सुनील श्रीसुंदर (रा.शांतीपुरा, छावणी परिसर)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. छावणी पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार १६ वर्षीय तरूणी ६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी प्रार्थनास्थळी गेली होती. तेथील प्रार्थना आटोपल्यांनतर रात्री ७ वाजेच्या सुमारास ती पायी घरी जात होती. येथील एका  चौकात रिक्षा घेऊन आलेल्या सागरने तिला गाठले आणि शिवीगाळ व मारहाण करीत बळजबरीने रिक्षात बसविले.  यानंतर आरोपीच्या सांगण्यावरून रिक्षाचालकाने  त्यांना कब्रस्थान रस्त्यावर नेऊन सोडले आणि रिक्षासह चालक तेथून निघून गेला. कब्रस्थान निर्जनस्थळ असल्याचे पाहून आरोपी तिला ओढतच तेथे घेऊन गेला. पीडिता आरडाओरड करून आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र तो तिला बेदम मारहाण करीत होता. निर्जनस्थळ असल्याने कोणाच्याही कानावर  तिचा आवाज  पडला नाही.  जीवे मारण्याची धमकी देत त्याने ओढणीने तिचे दोन्ही हात बांधून  तिच्यावर अत्याचार केला.  रात्री दहा वाजेच्या सुमारास तिने नराधमच्या तावडीतून स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. यानंतर थेट घरी जाऊन घडलेल्या अत्याचाराची माहिती तिने रडतच आईला सांगितली. याप्रकारामुळे पीडिता आणि तिच्या कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला.

पोलिसांत नोंदविली तक्रार
या प्रकारानंतर आरोपीला न घाबरता पीडितेला घेऊन तिचे आई-बाबा दुसऱ्या दिवशी सकाळी छावणी पोलीस ठाण्यात गेले . पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी सागरविरोधात विविध कलमानुसार गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस  निरीक्षक मनोज पगारे यांनी दिली.

जामीनवर सुटल्यानंतर पुन्हा अत्याचार
आरोपी सागर  याने काही महिन्यापूर्वी तक्रारदार मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी छावणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून त्याला अटक  केली होती. त्या केसमध्ये आरोपीला न्यायालयाने सशर्त जामीन दिल्यापासून तो जेलमधून  बाहेर  आला आहे.  दरम्यान आरोपीने  ६ रोजी पुन्हा पीडितेवर अत्याचार केल्याचे पो.नि. पगारे यांनी सांगितले.

Web Title: After being released on bail, the accused raped on 16-year-old girl again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.