चरबीपासून बनावट तूप; नागरिकांच्या जीवाशी खेळ; कारखाना उद्ध्वस्त - हॉटेलला पुरवठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2024 14:36 IST2024-01-03T14:34:17+5:302024-01-03T14:36:28+5:30
पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी, सहायक आयुक्त सुदाम जाधव यांनी मंगळवारी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारला. या कारवाईत तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे, तूप बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

चरबीपासून बनावट तूप; नागरिकांच्या जीवाशी खेळ; कारखाना उद्ध्वस्त - हॉटेलला पुरवठा
भिवंडी : शहरातील खाडीलगत ईदगाह साॅल्टर हाऊस येथे मोठ्या प्रमाणावर म्हशी व रेडा यांची चरबी वितळवून बनावट तूप बनविले जात होते. हे तूप शहरातील छोट्या-मोठ्या खानावळी, हॉटेल व्यावसायिकांना विक्री करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. पालिका आयुक्त अजय वैद्य यांच्या आदेशाने पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी, सहायक आयुक्त सुदाम जाधव यांनी मंगळवारी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासह घटनास्थळी छापा मारला. या कारवाईत तेथून मोठ्या प्रमाणावर बनावट तुपाचे डबे, तूप बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ईदगाह साॅल्टर हाऊस येथे बंद असलेल्या कत्तलखान्यात कापण्यात आलेल्या म्हशी, रेड्यांचे अवशेष तेथेच टाकण्यात येतात. या अवशेषाधून चरबी वेगळी काढून सुकवून त्यापासून तूप बनविण्याचे काम या भागात बिनदिक्कत सुरू होते. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
पालिका पर्यावरण विभागाचे सहायक आयुक्त सुदाम जाधव, आपत्कालीन विभागप्रमुख साकिब खर्बे, करमूल्यांकन विभागाच्या कार्यालयीन अधीक्षक सायरा बानो यांनी पालिका पथकासह या ठिकाणी कारवाई केली.
बनावट तुपाचे १५ किलो वजनाचे २० डबे
हे तूप भेसळ करून अनेक खानावळ, छोटी हॉटेल व तळलेले पदार्थ विक्री करणाऱ्यांना विक्री करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
पालिका अधिकाऱ्यांना तूप कढविण्याची भट्टी सुरू असल्याचे आढळले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी तूप कढविण्याच्या भट्टीवरील कढईमधील साहित्य फेकून देत, बनावट तुपाचे १५ किलो वजनाचे २० डबे, कढई असे मोठे साहित्य जप्त केले. याबाबत पालिका प्रशासनाकडून स्थानिक भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती जाधव यांनी दिली आहे.