अभिनेत्रीचे अश्लील फोटो झाले व्हायरल, आरोपीला धाराशिवमधून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 08:31 IST2024-01-17T08:31:09+5:302024-01-17T08:31:32+5:30
पुढील तपासासाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात आणले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अभिनेत्रीचे अश्लील फोटो झाले व्हायरल, आरोपीला धाराशिवमधून अटक
मुंबई : सोशल मीडियावर अभिनेत्रीचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या आरोपीला धाराशिव परिसरातून अटक करण्यात आली. संजय शालगर (३४) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील तपासासाठी वर्सोवा पोलिस ठाण्यात आणले जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा आरोपी धाराशिव परिसरात असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांना फेसबुक, इंस्टाग्राम, तसेच तक्रारदाराच्या मोबाइल विश्लेषणातून समजली. तो मूळचा पुण्याचा रहिवासी असून, वर्सोवा पोलिसांचे पथक पोलिस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय आणि वर्सोवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर, त्याला ताब्यात घेण्यात आले.
मॉर्फ फोटोबाबत मित्राकडून कळले
स्थानिक न्यायालयाची परवानगी घेऊन त्याला मुंबईत आणले जाणार असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपीने पीडितेचे मॉर्फ फोटो तिच्या पालकांना, मित्रांना आणि नातेवाइकांना त्यांच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठविले आहेत. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली जाईल, असे सोशल मीडियावर संदेश आल्यानंतर बुधवारी वर्सोवा पोलिसांत गुन्हा दाखल केला. पीडित दोन वर्षांपासून तिच्या मैत्रिणीसोबत अंधेरीत राहते. तिला २७ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या मॉर्फ फोटोबाबत मित्राकडून कळले. त्यानुसार, तिने वर्सोवा पोलिसांच्या सायबर विभागाकडे इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) पत्ता मागविला असून, या प्रकरणी आरोपीवर भादंवि कलमासह आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.