डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
By प्रशांत माने | Updated: December 15, 2025 22:22 IST2025-12-15T22:21:47+5:302025-12-15T22:22:38+5:30
अंबरनाथ, दिवा परिसरातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या

डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: नरेंद्र उर्फ काल्या भाई भालचंद्र जाधव (वय ३७) याचा धारदार शस्त्रांनी तब्बल ४० वार करून खून करणाऱ्या आरोपींना १२ तासात गजाआड करण्यात डोंबिवलीपोलिसांना यश आले. मुख्य आरोपी आकाश बिराजदार (वय २९) याच्यासह अन्य दोघांना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोन महिन्यांपूर्वी नरेंद्र याने आकाशला मारहाण केली होती. या गुन्हयात अटक झालेला नरेंद्र आधारवाडी कारागृहात होता. तीनच दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला. नरेंद्रने केलेल्या मारहाणीचा आकाशच्या मनात राग होता. नरेंद्र शनिवारी रात्री ११.३० वाजता कोपर स्टेशन जवळील परिसरात आला असता, आकाश आणि नरेंद्र यांच्यात वादावादीला सुरूवात झाली. शिवीगाळ आणि दमदाटीवर सुरू झालेला वाद फारच वाढला. यावेळी आकाश, त्याचा साथीदार दिवाकर गुप्ता (वय १८) आणि आकाशची सावत्र मुलगी आलिफा खान (वय १८) या तिघांनी नरेंद्रवर हल्ला केला.
चाकू, कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करत आकाशच्या डोक्यावर, मानेवर, गळ्यावर, छातीवर, पोटावर, पाठीवर, हातापायावर असे तब्बल ४० वार करून त्याला जीवे मारण्यात आले. यावेळी आकाशला वाचवण्यासाठी शुभम पांडे (वय २७) हा मध्ये आला होता. पण त्या तिघांनी त्यालाही शिवीगाळ केली आणि त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. तरीही त्याने मध्ये पडून भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या तिघांनी शुभमच्या डोक्यावर चाकूने वार केला. तसेच लाथाबुक्यांनी मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले.
अंबरनाथ, दिवा परिसरातून आरोपींच्या आवळल्या मुसक्या
गुन्ह्याच्या तपाससाठी पोलिस उपायुक्त, डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांनी विशेष पथक गठीत केले. पोलिस निरिक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरिक्षक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे १२ तासांच्या आत तिन्ही आरोपींच्या अंबरनाथ आणि दिवा परिसरातून मुसक्या आवळल्या. महत्वाचे म्हणजे खून झालेला नरेंद्र आणि मुख्य आरोपी आकाश या दोघांवर मारहाणीचे प्रत्येकी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.