फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार, नायगाव पोलीस ठाण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 14:13 IST2023-11-21T14:13:05+5:302023-11-21T14:13:58+5:30
चेंबूर येथे राहणारे मोहम्मद उमर अली (५०) हे वेल्डिंग काम करत असून ९ जून ते १४ ऑगस्ट दरम्यान आरोपींनी तुर्की या देशात चांगल्या प्रकारची नोकरी लावतो असे आमिष दाखवले होते.

फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस ठाण्यातून पसार, नायगाव पोलीस ठाण्यातील घटना
- मंगेश कराळे
नालासोपारा : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणुक करण्याच्या गुन्हयात अटक असलेला आरोपी नायगाव पोलीस ठाण्यातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके तयार केली असून परिसरात नाकाबंदी देखील लावण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले - श्रींगी यांनी लोकमतला सांगितले.
चेंबूर येथे राहणारे मोहम्मद उमर अली (५०) हे वेल्डिंग काम करत असून ९ जून ते १४ ऑगस्ट दरम्यान आरोपींनी तुर्की या देशात चांगल्या प्रकारची नोकरी लावतो असे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्यांचा मूळ पासपोर्ट जमा करत आरोपींच्या बँक खात्यात ६५ हजार रुपये घेतले होते. दिलेल्या तारखेला जुचंद्र येथील वेस्ट दोन मेन पॉवर येथील ऑफिसमध्ये व्हिजा व विमानाचे तिकीट देतो असे सांगत ऑफिस बंद करून सर्व आरोपी पळून गेले होते.
याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात मोहम्मद अली यांनी २६ ऑगस्टला नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपी मोहम्मद सकलैन मोहम्मद सिकातायन (५२) याला तुंगारेश्वर येथील मंगलमूर्ती बिल्डिंगमधून तपास पोलीस अधिकाऱ्याने अटक केल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित वसईच्या पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता सुरू होती.
रात्री पावणे नऊच्या सुमारास पोलीस ठाण्यात बसविण्यात आलेला आरोपी पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातूनच फरार झाला आहे. आरोपीवर यापूर्वी ३ गुन्हे दाखल असल्याची माहितीही समोर येत आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अशोक गुंजाळ यांनी पळून गेल्याप्रकरणी आरोपी विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपीबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे नायगाव पोलिसांनी आव्हान केले आहे.
पोलीस ठाण्यात लॉकअपची सुविधा नाही
१७ मार्चला पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या हस्ते उदघाटन करून सुरू करण्यात आलेल्या नायगाव पोलीस ठाण्यात आरोपींना ठेवण्यासाठी पोलीस कोठडीच उपलब्ध नाही. पोलीस ठाण्याच्या आवारातून सोमवारी रात्री पळून गेलेल्या आरोपीमूळे पोलीस कोठडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील आरोपींना वसई पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवावे लागत असल्याने ही घटना घडल्याची नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.