ॲसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला नांदेडात पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 18:18 IST2020-11-15T18:17:02+5:302020-11-15T18:18:05+5:30
Crime News : बीड जिल्ह्यात येळंबघाट परिसरात पुण्याहून गावी परत येत असताना प्रेयीसीवर ॲसिड हल्ला करण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील फरार आरोपी अविनाश रामकिशन राजुरे याला देगलूर तालुक्यातील आदमपूर येथे एका धाब्यावरुन पोलिसांनी अटक केली आहे.

ॲसिड हल्ला प्रकरणातील आरोपीला नांदेडात पकडले
नांदेड- बीड जिल्ह्यात येळंबघाट परिसरात पुण्याहून गावी परत येत असताना प्रेयीसीवर ॲसिड हल्ला करण्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणातील फरार आरोपी अविनाश रामकिशन राजुरे याला देगलूर तालुक्यातील आदमपूर येथे एका धाब्यावरुन पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. देगलूर तालुक्यातील शेळगावातील अविनाश रामकिशन राजुरे हा आणि पीडित तरुणी हे दोघे जण दिवाळीसाठी गावाकडे परत येत होते.
रात्र झाल्याने ते येळंबघाट परिसरात खडी क्रेशरजवळ मुक्कामासाठी थांबले होते. पहाटेच्या सुमारास अविनाशने तरुणीच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकले. तसेच पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर त्याने गंभीर भाजलेल्या तरुणीला सोडून घटनास्थळावरुन पळ काढला होता. तर दुसरीकडे पोलिसांनी जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. अविनाश हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील रहिवासी आहे. त्यामुळे बीड पोलिसांनी आरोपीबाबत नांदेड पोलिसांनी माहिती दिली होती.
पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनीही देगलूर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेची पथके परिसरात पाठविली होती. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास देगलूर तालुक्यातील आदमपूर येथे एका धाब्यावर जेवण करीत असल्याची टिप पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी लगेच त्याच्या मुसक्या आवळल्या. पुढील तपासासाठी आता आरोपी अविनाश राजुरे याला बीड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.