The absconding brothers of Goodwin Jewelers were eventually arrested | गुडवीन ज्वेलर्सच्या फरार अकराकरण बंधूंना अखेर अटक
गुडवीन ज्वेलर्सच्या फरार अकराकरण बंधूंना अखेर अटक

ठाणे : ठाणे, नवी मुंबईसह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ पसिरातील सुमारे १,१५४ गुंतवणूकदारांची २५ कोटींची फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या गुडवीन ज्वेलर्सचे प्रमुख सुनीलकुमार आणि सुधीरकुमार मोहनन अकराकरण या दोघा बंधूना शुक्रवारी ठाणे न्यायालयात शरण आल्यानंतर ठाणे शहर पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील तीन गुन्ह्यांसह राज्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. त्यांची २० कोटींची मालमत्ता आतापर्यंत जप्त केल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे पोलीस उपायुक्त संजय जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दिवाळीपासून ते फरार होते.

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील डोंबिवली, नौपाडा, शिवाजीनगर या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुडवीन ज्वेलर्सचे सोने-चांदीच्या दागिने विकण्याचे शोरूम होते. या भावंडांनी स्थानिक लोकांचा विश्वास संपादन करत गुंतवणुकीवर आकर्षक व्याज देण्याचे अमिष दाखवून सोने खरेदीकरीता आगाऊ रक्कम स्वीकारण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे त्यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सुमारे १ हजार १५४ गुंतवणुकदारांकडून अंदाजे २५कोटी रुपये स्वीकारले. मात्र, कबूल केल्याप्रमाणे परतावा न देता ऐन दिवाळीत २१ ऑक्टोबर २०१९ रोजी दुकाने बंद करून ते कुटुंबासह पळून गेले. यानंतर त्यांच्याविरूद्ध तिन्ही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

मागील दीड महिन्यांपासून ठाणे गुन्हे शाखा व आर्थिक गुन्हे शाखेच्या पथक केरळ राज्यातील त्रिचुर येथे तळ ठोकून होते. याचदरम्यान पोलिसांनी तेथील स्थानिक जनता आणि नातेवाईकांच्या मदतीने शोध मोहिम हाती घेतली होती. यात त्यांच्या अनेक मालमत्तेचा शोध घेऊन त्या जप्त केल्या. तसेच बँक खाती, शोरूम, घर, बंगले,फार्महाऊस, शेतजमिन, मर्सिडीज, फॉर्च्युनर, म्युचुअल फंड, एलआयसी, शेअर्स अशा मालमत्ता गोठविल्या. अशाप्रकारे त्यांची सर्व बाजूने शोध मोहिमेद्वारे पूर्णत: नाकाबंदी केली होती. यातून, शुक्रवारी ते ठाणे विशेष न्यायालयाच्या एमपीआयडी कोर्टात शरण येणार असल्याची माहिती ठाणे शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दोघा भावांना न्यायालयातून ताब्यात घेऊन अटक केली.

आज न्यायालयात हजर करणार

दोघांविरोधात भादंवि कलम ४२०,४०६,३४,४०९ सह कलम ३,४ एमपीआयडी अ‍ॅक्ट १९९९ सह कलम ३,४,५ बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझीट स्कीम अ‍ॅक्ट २०१९ या व्यतिरिक्त महाराष्टातील पालघर, वसई, पुणे अशा ६ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यमध्ये नव्याने जुलै २०१९ मध्ये पारीत केलेला बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझीट स्क्रीम अ‍ॅक्ट २०१९ याचादेखील समावेश केला. शनिवारी दोघांना न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त जाधव यांनी दिली.

गुंतवणूकदारांना आवाहन

गुडवीन ज्वेलर्सकडून ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे, त्यांनी त्यांच्या तक्रारीबाबत ठाणे शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा यांच्याशी संपर्क साधण्याचेही आवाहन पोलीस उपायुक्तांनी केले.

Web Title: The absconding brothers of Goodwin Jewelers were eventually arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.