नऊ वर्षीय मुलीचे अपहरण; ३६ तास लोटूनही लागला नाही छडा, पोलीस यंत्रणेतही खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 00:11 IST2021-09-28T00:10:51+5:302021-09-28T00:11:53+5:30
Crime News : मुलीचे आईवडील बुटीबोरीत रोजगाराच्या निमित्ताने राहतात. तर, मामा आणि आजी-आजोबा उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकरधोकडा गावात राहतात.

नऊ वर्षीय मुलीचे अपहरण; ३६ तास लोटूनही लागला नाही छडा, पोलीस यंत्रणेतही खळबळ
- नरेश डोंगरे
नागपूर - उमरेड तालुक्यातील एका नऊ वर्षीय मुलीचे अज्ञात आरोपीने अपहरण केल्याची घटना उजेडात आली आहे. ३६ तास होऊनही बेपत्ता मुलीचा शोध लागला नसल्याने पालकांसोबतच पोलीस यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. परिणामी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह शंभरावर पोलीस बेपत्ता मुलीचा शोध घेत आहेत.
मुलीचे आईवडील बुटीबोरीत रोजगाराच्या निमित्ताने राहतात. तर, मामा आणि आजी-आजोबा उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मकरधोकडा गावात राहतात. शेत आणि दुग्ध विक्रीचा ते व्यवसाय करतात. नऊ वर्षीय कविता (नाव बदललेले) मामाच्या घरी अर्थात आजी-आजोबाकडे राहायची. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ९ च्या सुमारास शौचासाठी शेताकडे गेली.
दुपार झाली तरी परत आली नाही म्हणून मामा आणि आजी-आजोबांसोबतच अन्य नातेवाईकांनी तिचा गावात शोध घेतला. कदाचित आई-वडिलांकडे (बुटीबोरीला) गेली असावी, असे वाटल्याने कविताच्या आई-वडिलांकडेही विचारपूस करण्यात आली. मात्र, तिकडेही ती गेली नव्हती. त्यामुळे ती बेपत्ता झाल्याचे कळाल्यानंतर गावकरीही कविताचा आजूबाजूच्या शेतशिवारात शोध घेऊ लागले. ती कुठेही आढळली नाही. त्यामुळे तिच्या मामांनी उमरेड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.
उमरेडपासून मकरधोकडा गाव १२ किलोमीटर आहे. पोलिसांनी या परिसरात कविताचा शोध सुरू केला. तिच्या बेपत्ता होण्यासोबतच अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याची सचित्र माहिती पोलिसांनी सर्वत्र प्रसारित केली. मात्र, कविताबाबत कुठलीही माहिती सोमवारी रात्रीपर्यंत उपलब्ध न झाल्याने पोलिसांचीही धावपळ वाढली आहे.
नागपूर ग्रामीणचे अधीक्षक राकेश ओला तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना मकरधोकडा, उमरेडमध्ये पाठविले आहे. त्यानुसार, एसडीपीओ भीमराव टेळे, गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जिट्टावार आणि उमरेडचे ठाणेदार यशवंत सोलसे, प्रशांत खोब्रागडे यांच्यासह ठिकठिकाणचे पोलीस उमरेड तसेच आजूबाजूच्या गावात बेपत्ता कविताचा शोध घेत आहेत.
कोणताही ‘कॉल’नाही
विशेष म्हणजे, कविताचे अपहरणच करण्यात आले असावे, असे पोलिसांकडून मानले जात असले तरी अद्याप तिच्या नातेवाईकांना खंडणीसाठीवगैरे कोणताही कॉल आलेला नाही. खंडणीसाठी अपहरण करावे, अशीही आर्थिक स्थिती तिच्या नातेवाईकांची नाही. दुसरे म्हणजे, तिला कुणी सोबत नेल्याचीही माहिती सोमवारी रात्रीपर्यंत उघड झाली नाही.
शंकाकुशंका, तर्कवितर्कांना उधाण
३६ तासापेक्षा जास्त कालावधी होऊनही कविता मिळाली नाही किंवा तिच्याबाबत कसलीही माहिती उपलब्ध न झाल्याने मकरधोकडाच नव्हे तर उमरेड पंचक्रोशीत वेगवेगळ्या शंकाकुशंकांना उधाण आले आहे. प्रत्येक जण तर्कवितर्क लावत आहेत. हादरलेली पोलीस यंत्रणा मात्र सर्वत्र कविताचा शोध लावण्यासाठी धावपळ करीत आहे.