अबब ... चोरट्यांनी उचलून नेले चक्क 78 एसी; कमी वेळेत झटपट जास्त पैसे कमविण्याची लालसा अंगलट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 20:30 IST2021-08-27T20:29:27+5:302021-08-27T20:30:10+5:30
Robbery Case : डोंबिवलीत एका नवीन बांधकामाच्या ठिकाणाहून चोरांनी चक्क 78 एसी चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

अबब ... चोरट्यांनी उचलून नेले चक्क 78 एसी; कमी वेळेत झटपट जास्त पैसे कमविण्याची लालसा अंगलट
कल्याण - अलीकडे कल्याण डोंबिवली शहरात मेडिकल दुकानं, किराणा दुकानं , ज्वेलर्सची दुकानं इतकचं नाही तर वाईन दुकानांतुन दारूही चोरीला गेल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. मात्र, डोंबिवलीत एका नवीन बांधकामाच्या ठिकाणाहून चोरांनी चक्क 78 एसी चोरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, पोलिसांनी लागलीच एसी चोरणा-या 5 आरोपींना अटक केली आहे.
कल्याण - शीळ मार्गावर रिजेन्सी अनंतम येथे बांधकाम सुरू असलेल्या नविन इमारतीमध्ये डायकीन कंपनीचे काही एसी ठेवले होते. येथून 78 एसी चोरीला गेल्याबाबत सुपरवायझर जितेंद्र शिरसाळे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हा नोंद झाल्यावर लागलीच दोन आरोपींनी मिरारोड येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळालं. या दोन्ही आरोपींकडे अधिक चौकशी केली असता व तांत्रिक माहितीच्या आधारे आणखी तीन आरोपींचा शोध पोलिसांनी घेतला. रहेमान खान, दीपक बनसोडे, मोहम्मद सलीम, विनोद महते, आदील कपूर, अशी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 5 लाख 88 हजार किंमतीचे डायकीन कंपनीचे 20 एसी युनिट तसेच 15 लाख किंमतीच्या दोन इर्टीका गाड्या असा एकूण सुमारे 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.याप्रकरणी मानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.