"माझे पप्पा आमदार...", पोलिसांनी पकडताच आप नेत्याच्या मुलाची दादागिरी; बाईक सोडून पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:32 IST2025-01-24T11:32:25+5:302025-01-24T11:32:55+5:30
दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या मुलाची बाईक जप्त केली आहे.

"माझे पप्पा आमदार...", पोलिसांनी पकडताच आप नेत्याच्या मुलाची दादागिरी; बाईक सोडून पळाला
दिल्लीपोलिसांनी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या मुलाची बाईक जप्त केली आहे. पोलिसांनीआप आमदाराच्या मुलाला चुकीच्या बाजूने बाईक चालवल्याबद्दल थांबवलं होतं. जेव्हा मुलाकडे लायसन्स आणि आरसी मागितलं तेव्हा तो दोन्हीही गोष्टी दाखवू शकला नाही. त्याने पोलिसांना सांगितलं की, माझे पप्पा आमदार आहेत.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) पार्श्वभूमीवर, जामिया नगरचे एएसआय आणि एसएचओ त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करत होते. जेव्हा ते बाटला हाऊसमधील नफीस रोडवर पोहोचले तेव्हा बाईकवर असलेली दोन मुलं चुकीच्या बाजूने येताना दिसली. बाईकला मॉडिफाय सायलेन्सर बसवण्यात आला होता, जो खूप मोठा आवाज करत होता. मुलं हलगर्दीपणाने बाईक चालवत होती.
आमच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही दोघांनाही थांबवलं आणि तपास सुरू केला. चौकशीदरम्यान, बाईक चालवणाऱ्या मुलाने स्वतःची ओळख आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्लाह खान यांचा मुलगा असल्याचं सांगितलं. त्याने पोलिसांना म्हटलं की, आपचं चिन्ह असल्याने तुम्ही माझी बाईक थांबवली. यावेळी मुलाने पोलिसांशीही गैरवर्तन केलं.
एएसआयने दोन्ही मुलांना त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी दाखवण्यास सांगितलं. बाईक चालवणाऱ्या मुलाने सांगितलं की, त्याला लायसन्स आणि आरसीची गरज नाही. कारण तो स्थानिक आमदार अमानतुल्लाह खान यांचा मुलगा आहे. त्यानंतर पोलिसांनी आमदाराला फोन केला. याच दरम्यान मुलगा बाईक खाली टाकून पळून गेला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.