उल्हासनगरात तरुणाला नोकरीचे आमिष व नियुक्तपत्र देऊन केली ८ लाखाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 18:28 IST2022-06-19T18:26:37+5:302022-06-19T18:28:08+5:30
बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून व नियुक्तीचे बनावटपत्र देऊन २२ वर्षीय तरुणाची ८ लाखाने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला.

उल्हासनगरात तरुणाला नोकरीचे आमिष व नियुक्तपत्र देऊन केली ८ लाखाची फसवणूक
सदानंद नाईक
उल्हासनगर : बृहन्मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून व नियुक्तीचे बनावटपत्र देऊन २२ वर्षीय तरुणाची ८ लाखाने फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अंजली राजाराम मुनेश्वर या महिलेवर गुन्हा दाखल केला असून महिलेने अन्य जणांना फसविले काय?. याद्वारे पोलीस चौकशी करीत आहेत.
उल्हासनगर मराठा सेक्शन परिसरात राहणारी अंजली मुनेश्वर या महिलेने आशेळेगावात राहणारा २२ वर्षीय तरुण गिरीश लिंबा पवार व त्याचा चुलत भाऊ जगदीश पवार यांना संदीप बाविस्कर नावाचा व्यक्ती बृहमुंबई महानगरपालिकेत नोकरी लावून देतो असे आमिष दाखविले होते. ६ एप्रिल २०२१ ते २४ फेब्रुवारी २०२२ दरम्यान बनावट नियुक्तीपत्र देऊन गुगल पे द्वारे व वेगवेगळ्या बँक खात्यात ८ लाख रुपये घेतले. तसेच मुंबई महापालिकेच्या खोट्या शिक्के व खोटी सही मारलेले बनावट नियुक्ती पत्र दिले. मात्र हे नियुक्ती पत्र घेऊन गिरीश मुबंई महापालिकेच्या कार्यलयात गेला असता, नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. आपली फसवणूक झाली. हे लक्षात आल्यावर गिरीष पवार याने विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य बघून अंजली मुनेश्वर या महिलेवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.